आदिम लगीन सोहळ्यातून उजळला संस्कृतीचा दीप : तळपाडे–भांगरे परिवाराने जपला आदिवासी अस्मितेचा वारसा
सांगवी (ता. अकोले), दि. २८ जून : जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात अनेक पारंपरिक लोकसंस्कृती विस्मृतीत जात असताना अकोले तालुक्यातील सांगवी येथे संपन्न झालेला तळपाडे व भांगरे परिवाराचा आदिम पारंपरिक विवाहसोहळा हा केवळ दोन व्यक्तींचा वैवाहिक समारंभ नव्हता, तर आदिवासी संस्कृती, परंपरा, निसर्गपूजक जीवनदृष्टी आणि सामुदायिक मूल्यांचे प्रभावी सार्वजनिक दर्शन घडवणारा सांस्कृतिक सोहळा ठरला. परिसरात या विवाहाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
नवरी : सुवर्णा
नवरदेव : प्रविण
आज अनेक विवाह समारंभांमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली स्थानिक परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक ओळख मागे पडताना दिसते. अशा काळात तळपाडे व भांगरे परिवाराने आदिवासी समाजाच्या मूळ परंपरांना आधुनिकतेसमोर न झुकवता सन्मानाने जपण्याचा प्रयत्न केला. हा विवाह म्हणजे "संस्कृती ही प्रदर्शनाची वस्तू नसून ती जगण्याची पद्धत आहे" याची जिवंत प्रचिती होती.
विवाहपूर्व हळद, देवक, तेलवान, पारंपरिक लग्नगीते, सामुदायिक सहभाग अशा सर्व विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले. प्रत्येक विधीमागे निसर्ग, कुटुंब, पूर्वज आणि समाज यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात होती.
या विवाहाचे विशेष आकर्षण ठरला तो मांडव डहाळ्यांचा सोहळा. सांगवी गावातून पाच पालईंच्या डहाळ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सजविलेल्या बैलगाड्या, आदिवासी पारंपरिक नृत्यपथके, कांबड नृत्य, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघालेली ही मिरवणूक उपस्थितांना आदिवासी जीवनपद्धतीच्या मुळाशी घेऊन गेली.
उंबर, आंबा, जांभूळ, रुई आणि बोर या पाच पालईंनी विवाहमंडप उभारण्यात आला. या वृक्षांची निवड ही केवळ धार्मिक श्रद्धा नसून जैवविविधतेचे संरक्षण, निसर्गाशी नाते आणि पर्यावरणपूरक जीवनमूल्यांचे प्रतीक असल्याचे जाणकारांनी सांगितले.
विवाहस्थळी आदिवासी टोटेम, कुळचिन्हे, पारंपरिक शस्त्रे, दगडी दिवा, पूर्वजांचे स्मरण, वीरपुरुषांचे प्रतीक आणि कुळसाय यांची सन्मानपूर्वक मांडणी करण्यात आली होती. त्यानंतर धरती माता, सूर्य, चंद्र, अग्नी आणि वायू या पंचमहाभूतांचे पूजन करण्यात आले.
नवरा-नवरीने धान्य, शस्त्रे, निसर्ग, पूर्वज आणि समाज यांचे पूजन करून विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा संबंध नसून संपूर्ण जीवनव्यवस्थेशी बांधिलकी स्वीकारण्याचा संस्कार असल्याचा संदेश दिला.
नवऱ्याच्या घरातील ज्येष्ठ महिलेने नवरीला आदिवासी परंपरेतील मानाचे फडके परिधान करून सन्मानित केले. या कृतीतून स्त्रीला कुटुंबात सन्मानाने स्वीकारण्याची लोकपरंपरा अधोरेखित झाली.
त्यानंतर मांडवगणाच्या पारंपरिक लगन्या म्हणण्यात आल्या. नवदांपत्याने उपस्थितांना हात जोडून आशीर्वाद मागितला आणि उपस्थितांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या विवाहाला आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे, बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे, सतीश भांगरे, आदिवासी विचारमंच महाराष्ट्र राज्याचे भाऊसाहेब गंभीरे, ॲड. राजाराम बेंडकोळी, बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ते, आदिवासी साहित्यिक, अभ्यासक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तसेच पंचक्रोशीतील नागरिक, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विवाहाने एक महत्त्वाचा प्रश्न समाजासमोर उभा केला, तो म्हणजे आपण विकासाच्या नावाखाली आपली सांस्कृतिक मुळे विसरत तर नाही ना?
आदिवासी संस्कृती ही निसर्ग जिंकण्याची नव्हे, तर निसर्गासोबत जगण्याची संस्कृती आहे. येथे विवाह हा खर्चाचा उत्सव नसून सामूहिक जबाबदारीचा संस्कार आहे. येथे मंडप उभा राहतो तो जंगलाशी नाते सांगणाऱ्या वृक्षांवर; देवत्व शोधले जाते ते माती, धान्य, सूर्य, पाणी आणि पूर्वजांमध्ये; आणि वैवाहिक जीवनाची सुरुवात होते ती समाजाच्या आशीर्वादातून.
आज अनेक ठिकाणी विवाहसोहळे स्पर्धा, दिखाऊपणा आणि आर्थिक ओझ्याचे प्रतीक बनत असताना सांगवीतील हा आदिम विवाह पर्यावरणपूरक, संस्कृतिप्रेमी आणि मूल्यकेंद्री समाजजीवनाचा आदर्श ठरला आहे.
संस्कृती जपणे म्हणजे भूतकाळात अडकून राहणे नव्हे; तर आपल्या ओळखीचा पाया भविष्यातही मजबूत ठेवणे होय. समाज जिवंत राहतो तो त्याच्या भाषा, लोककला, विधी, स्मृती आणि मूल्यांमुळे. जे समाज आपल्या पूर्वजांना विसरतात, ते हळूहळू स्वतःलाच विसरू लागतात.
तळपाडे व भांगरे परिवाराने साकारलेला हा विवाह सोहळा आदिवासी समाजासाठी केवळ एक कौटुंबिक कार्यक्रम नसून सांस्कृतिक आत्मसन्मानाचा जाहीर कार्यक्रम ठरला आहे. अशा उपक्रमांमुळे पुढील पिढ्यांना आपल्या परंपरेची ओळख होईल, लोकसंस्कृतीचे दस्तऐवजीकरण होईल आणि आदिवासी अस्मितेचा वारसा अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.
0 comments :
Post a Comment