महादेव कोळी जमात महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमातींपैकी एक आहे. ही जमात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे जिल्ह्यातील काही ठराविक भागांत आढळते. महादेव कोळी जमात ही महाराष्ट्राच्या आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या जमातीलाच 'कोळी महादेव' जमात असेही म्हणतात. या जमातीची जीवनपद्धती, परंपरा, वेशभूषा, लोकगीतं, नृत्यं आणि सण-उत्सव यामध्ये या जमातीचा सांस्कृतिक ठेवा दिसून येतो.
| Photo by Ravindra Dagale |
'An Account of the Tribe of Mhadev Koli' या आपल्या अहवालात कॅप्टन मॅकिंटोश याने महादेव कोळी जमातीचे वास्तव्य असणाऱ्या प्रदेशाचे वर्णन केले असून तो म्हणतो,
"पुण्याच्या दक्षिण-पश्चिमेला असणाऱ्या मुसा खोऱ्यापासून उत्तरेला गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरपर्यंत पसरलेल्या पर्वतीय प्रदेशातील पूर्व उतारावर वास्तव्य करणाऱ्या महादेव कोळी जमातीचा वृत्तांत देण्याचा माझा उद्देश आहे."
| Photo by Ravindra Dagale |
महादेव कोळी जमातीचे मूळ जुन्नर तालुक्यातील कुकडेश्वर मंदिर परिसरात आढळून येते व या भागातून ही जमात इतरत्र स्थलांतरित झाल्याचे मत डॉ. गोविंद गारे यांनी आपल्या सह्याद्रीतील महादेव कोळी या पुस्तकात नोंदवले आहे. डोंगरी भागातील शेतकरी आणि शिकारी म्हणूनही या जमातीची विशेष ओळख आहे.
| Photo by Ravindra Dagale |
महादेव कोळी जमातीचा उल्लेख मध्ययुगीन काळातील ऐतिहासिक ग्रंथांमध्येही सापडतो. त्यावरून ही जमात सह्याद्री पर्वत रांगात पूर्वीपासून वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट होते.
| Photo by Raju Thokal |
पेशव्यांच्या काळात महादेव कोळी हे लढाऊ लोक म्हणूनही ओळखले जात होते. त्या काळात बारा मावळातील गडकिल्ल्यांचे नाईक हे प्रामुख्याने महादेव कोळी जमातीतील होते. सन 1443 पर्यंत शिवनेरी किल्ला महादेव कोळी समाजाच्या ताब्यात होता. इ.स.1750-51 पर्यंत सुरगाणा प्रांतातील 14 महल व किल्ले महादेव कोळी जमातीच्या नायकांच्या ताब्यात होते. सन 1857 च्या सुमारास ब्रिटिशांनी अकोले, नाशिक विभागात महादेव कोळी पलटन स्थापन केली होती. यावरून या जमातीचा लढाऊ बाणा आपणास दिसून येतो. महादेव कोळी प्रदेशाला बावन्न मावळांचा प्रदेश म्हणूनही ओळखले जात होते. या बावन्न मावळांच्या प्रदेशाचे मुख्यालय जुन्नर येथे होते आणि यास बावनचावडी असे म्हटले जात होते. या चावडीची स्थापना सन 1673 साली करण्यात आली होती.
क्रिमिनल क्लासेस ऑफ बॉंबे प्रेसिडेंसी या सन 1908 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात डब्ल्यू कुक यांनी महादेव कोळ्यांचा उल्लेख 'सोलजर्स ऑफ नाईट' असा केलेला आहे.
महादेव कोळी जमातीचे वर्गीकरण Hills and Aboriginal Tribes या सदरात 1933 साली करण्यात आले. सन 1938 साली सर सिमिंग्टन समितीच्या व सन 1942 साली मॅक्लॅगन समितीच्या शिफारसींमुळे महादेव कोळी जमातीला विशेष शैक्षणिक सवलती मिळू लागल्या. या समित्यांनी महादेव कोळी व इतर कोळी यातील फरक स्पष्ट केलेला आहे.
महादेव कोळी जमातीची संस्कृती:
भाषा:
महादेव कोळी जमातीची स्वतंत्र अशी बोलीभाषा आहे, तिला मावळी किंवा डांगाणी असे म्हणतात. आजही ही बोलीभाषा आपले स्वतंत्र अस्तित्त्व टिकवून आहे. रानकवी तुकाराम धांडे यांच्या बहुतांश कविता महादेव कोळी बोलीभाषेत आहेत.
| Photo by Ravindra Dagale |
वेशभूषा:
पुरुष पारंपरिक धोतर, कोपरी आणि फेटा वापरतात.
तर महिलांचा पोशाख हा धांदूक फडकी असा दिसून येतो. काही महिला अंगात चोळी व वट्याचे लुगडे नेसतानाही दिसून येतात.
| Photo By Raviraj Bhangare |
सण-उत्सव:
पोळा, दिवाळी, होळी, आणि दसरा हे सण उत्साहात साजरे करतात. निसर्गपूजा ही महत्त्वाची आहे. पान, फुले, गवत, डोंगर, आणि नद्या हे पवित्र मानले जातात. त्यामुळे कळसुबाई, दुर्गुबाई, वरसूबाई, घोरपडा देवी, उंबऱ्या देव यांचीही पूजा केली जाते.
| Photo by Ravindra Dagale |
लोककला आणि नृत्य:
महादेव कोळी जमात ही सैनिकी जमात आहे. त्यामुळे आज पर्यंतचा इतिहास बघता या जमातीने आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी प्रचंड मोठा संघर्ष केलेला आहे. त्यामुळे इतर आदिवासी जमातीत आढळतात तसे नृत्य प्रकार महादेव कोळी जमातीत आढळून येत नाहीत. परंतु कांबडनाच, पारंपरिक लेझिम इत्यादी पारंपरिक कला दर्शविणारे नृत्य महादेव कोळी करताना आढळून येतात. बोहडा हा लोकसंस्कृती जपणारा महोत्सव मोठ्या प्रमाणात आजही महादेव कोळी साजरा करताना दिसून येतात. विविध सण - उत्सवांत डफ, ढोल आणि ताशाचा वापर करून नृत्य सादर केले जाते.
महादेव कोळी जमातीत असणारा पारंपरिक लेझिम हा ऐतिहासिक काळातील गुप्त संदेश प्रसारित करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम होते. यातून महादेव कोळी जमातीच्या सैनिकी कौशल्याची जाणीव आपणास होते.
| Photo by Ravindra Dagale |
शेतातील कष्टाची कामे करताना भलरी गीते गाण्याची परंपरा महादेव कोळी जमातीत प्रचलित आहे.
आहार:
भात, नाचणीची भाकरी, सावा, वरई, डाळ, कंदमुळे, रानभाज्या आणि मटण हा महादेव कोळी जमातीचा मुख्य आहार आहे. लग्न कार्य व इतर सार्वजनिक कार्यक्रमात लाफशी हा गोड पदार्थ देखील बनवला जातो.
| Photo by Ravindra Dagale |
धार्मिक श्रद्धा:
महादेव कोळी जमात ही निसर्ग पूजक जमात आहे. या जमातीच्या नावातच महादेव हा शब्द प्रयोग आहे. यावरून ही जमात महादेवाला पुजणारी आहे हे स्पष्ट होते. परंतु महादेव कोळी ही जमात कुलचिन्ह पुजणारी जमात आहे. या जमातीत कुल चिन्हानुसार वरस (वरसूबाई), उंबर(उंबऱ्यादेव), डोंगर(कळसूबाई/ दुर्गुबाई), घोरपड( घोरपडादेवी) इत्यादी निसर्गातील प्रतिकांची पूजा केली जाते.
| Photo by Ravindra Dagale |
सामाजिक रचना:
महादेव कोळी जमातीत कुटुंबकेंद्रित जीवन पद्धती आढळते. वडीलधा-या मंडळींचा आदर केला जातो. विवाह, सण-उत्सव, आणि ग्रामसभांमध्ये एकत्रित सहभाग दिसतो. पूर्वीच्या काळी न्याय निवाडा करण्यासाठी महादेव कोळी जमातीची जमात पंचायत होती. त्याचे मुख्यालय जुन्नर हे होते.
| Photo by Ravindra Dagale |
द्याज पद्धत :
महादेव कोळी जमातीत हुंडा दिला जात नाही. उलट नवरा मुलाकडून नवरी मुलीच्या वडिलांना ठरल्याप्रमाणे द्याज द्यावे लागते. तसेच महिलांना सन्मानाची वागणूक या जमातीत दिली जाते.
| Photo by Ravindra Dagale |
विधवा विवाह :
आदिवासी समाजामध्ये विधवा विवाह व पुनर्विवाह करण्याची प्रथा सर्व मान्य आहे पुनर्विवाहाच्या प्रथेला मोहतर लावणे असं म्हटलं जातं गावकऱ्यांच्या व पंचांच्या संमतीने वर वधूला कुंकू लावतो व ते ग्रामदैवतासमोर एकमेकांना माळा घालतात व त्याला समाज मान्यता मिळते त्याला मोहतर लावणे किंवा माळ घालणे असे म्हणतात. सतीची प्रथा महादेव कोळी जमातीत नव्हती.
| Photo by Ravindra Dagale |
जन्म विधी :
बाईचे पहिले बाळंतपण माहेरी होते. बाळंतपण करणाऱ्या महिलेस सुईण असे म्हणतात. मुलाच्या जन्मानंतर आईला पहिले पाच दिवस भाताची पेज शिजवून देतात. याला पत असे म्हणतात. तसेच पाच दिवस विटाळ पाळण्याची देखील प्रथा आहे. पाचव्या दिवशी सटीची पुजा केली जाते. तिला पाचवी किंवा पाटा पूजन असे म्हणतात. मूल रांगू लागल्यावर पाच पावलीचा कार्यक्रम करण्याची प्रथा आहे.
| Photo by Ravindra Dagale |
मृत्यू विधी :
मृत माणसाचे प्रेत पुरण्याची प्रथा महादेव कोळी जमातीत आहे. अलीकडे बदलत्या काळामध्ये प्रेत जाळण्याचा प्रघात पडलेला दिसतो.
| Photo by Ravindra Dagale |
गोतरानी पद्धत :
महादेव कोळी जमातीचे नियम बदलणे, नवे नियम करणे, नव्या परंपरा सुरु करणे, लग्नकार्य आणि मृत्यू विधीच्यावेळी हजर राहणे, वेळ प्रसंगी समाजाच्या तातडीच्या बैठका बोलविणे, निरोप, बातम्या देऊन समाजाला एकत्र आणणे इत्यादी समाज विकासाची कामे पार पाडण्यासाठी गोतरानी पद्धत अस्तित्वात होती.
प्रेरणास्थान, आधारस्तंभ व मार्गदर्शक :
जव्हार संस्थांनची स्थापना करणारे जायबा मुकणे, क्रांतिवीर रामजी भांगरे, महानायक राघोजी भांगरे, विरांगना रुख्मिणी खाडे, हैबती खाडे, होनाजी केंगले, सत्तू मराडे, रामा किरवा, काशिराम खाडे, खेमा नाईक, जावजी बांबळे, ओतूरचे शेळकंदे पाटील, अंदरमावळचे मोरमारे, क्रांतिवीर बापू भांगरे, पदाजी निर्मळ, धर्मा मुंढे, भाऊ धनगर, खंडू साबळे, रानो मुंढे, विठू साबळे, दादू दाते, रामा मुऱ्हे, बाळू पिचड, ढवळा भांगरे, रामा डगळे, दुसऱ्या महायुद्धात पायलट म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे यशवंतराव मुकणे, 1930 च्या जंगल सत्याग्रहात सक्रिय सहभागी असणाऱ्या जिजाबाई जानकु भांगरे व बोलीभाषेत राघोजी भांगरे यांची गीते गाणाऱ्या शेवंताबाई पांडु भांगरे इत्यादी अनेक क्रांतीविरांची व महानायकांची महादेव कोळी जमातीला प्रेरणा आहे.
अलीकडच्या काळाचा विचार केला तर डॉ.गोविंद गारे (IAS), मधुकरराव पिचड साहेब, कॉ. बी के देशमुख, कृष्णराव मुंढे, ऍड.मनोहरराव देशमुख, कृष्णा रामा साबळे उर्फ साबळे गुरुजी, नारायण नवाळी, गोपाळराव भांगरे, यशवंतराव भांगरे, कावजी साबळे, गोपाळ धोंडू भांगरे, सीताराम जोशी (माजी उपकुलसचिव, पुणे विद्यापीठ), शंकरराव केंगले (आंबेगाव), एकनाथ शंकर देशमुख (राजूर), रखमाजी सांगडे (हडसर), यशवंत धोंडीबा मेचकर, वाळू शंकर कोंडार, जावजी लोहकरे (आंबेगाव), गोविंदराव कडाळी, अनादी अंबुजी शेंडे, चिमाजी रामजी कारभळ (तळेरान), कलावती शंकर करवंदे (जव्हार), बाळकृष्ण विठ्ठल भांगरे, दाजी चिमा गोडे (तळेरान) यांचे कार्य महादेव कोळी जमातीला आधार देण्याचे काम करत आहे. महादेव कोकणे (CME दापोडी), सिताराम मोघाजी सुपे, मोतीराम भालचिम (इन्कम टॅक्स ऑफिसर), सोमा कुशाबा गवारी, मुरलीधर जोशी (इन्कम टॅक्स ऑफिसर), प्रकाश केंगले ( जॉईंट कमिशनर, इन्कम टॅक्स ऑफिस), दत्तात्रय केंगले ( इन्कम टॅक्स ऑफिसर), ज्ञानदेव मुकणे ( साखर संकुल, pune), दिगंबर रुपाजी घोडे ( जॉईंट कमिशनर), मंगल दिगंबर घोडे, विश्वनाथ नामदेव सांगडे ( सहाय्यक सचिव, एस एस सी बोर्ड पुणे), गंगाराम अनाजी सांगडे ( उपसंचालक, एम्प्लॉयमेन्ट विभाग), देवजी बुधाजी घोडे ( विक्रीकर उपयुक्त), पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागात आदिवासी शिक्षण संस्था स्थापन करून शिक्षणाची पहिली मुहूर्तमेढ रोवणाऱ्या कोंडू मारुती बोकड गुरुजी यांचेही कार्य महादेव कोळी जमातीसाठी महत्त्वपूर्ण आहे. तसेच पद्मश्री राहिबाई पोपेरे, ममताताई भांगरे यांनी महादेव कोळी जमातीच्या पारंपरिक ज्ञानाची ओळख जगाला करून देण्याचे काम केले आहे. आजच्या अतिशय अतितटीच्या काळात डॉ. किरण लहामटे हे समाजाच्या हक्क अधिकारासाठी आवाज उठविण्याचे काम करत आहेत.
अकोले तालुक्यातील महादेव कोळी जमातीतील पहिले पदवीधर पी.डी.साबळे, मधुकर तळपाडे, रानकवी तुकाराम धांडे, ऍड.राजाराम बेंडकोळी, प्रा.सुरेश देशमुख, डॉ.राहुल पिचड, प्रा.तुकाराम रोंगटे, प्रा.संजय लोहकरे, शास्त्रज्ञ रामदास डामसे, एकनाथ बुरसे, सतिश लेंभे, वसंत पिचड, मुरलीधर बांडे, राहुल सी भांगरे, डॉ.विलास गवारी, पी.सी. झांबाडे, शाहीर ढवळा ढेंगळे, सुनिता बुरसे, डॉ.संतोष सुपे, नामदेव गंभीरे, डॉ.कृष्णा भवारी, सीता किर्वे ( आदिवासी खाद्य संस्कृती ) आदी मान्यवर आज महादेव कोळी जमातीला व इतर आदिवासी बांधवांना दिशा देण्याचे काम करत आहेत.
सध्यस्थिती आणि विकास:
महादेव कोळी जमात अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट असल्यामुळे त्यांना शासकीय सवलती आणि योजना मिळतात.
शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रांमध्ये विकास होत आहे. शिक्षण व आधुनिक शेती यामुळे ही जमात इतर जमातींपेक्षा अधिक प्रगत दिसून येते.
शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार या जमातीत अधिक वेगाने झाल्याने आणि मुळातच ही जमात लढाऊ जमात असल्याने राज्याच्या, देशाच्या विविध क्षेत्रात या जमातीतील प्रतिनिधी दिसून येतात. आज पर्यंतचा इतिहास बघता आदिवासी समाजाच्या हक्क आणि अधिकारांसाठी न्याय्य लढा उभारण्यात ही जमात नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
खाजगीकरण व भांडवलशाही व्यवस्था यामुळे या जमातीचे व एकूणच आदिवासी समाजाचे संविधानिक हक्क व अधिकार डावलले जात आहेत. वाढती बेरोजगारी, व्यसनाधिनता, उच्च व तंत्रशिक्षणातील घटती संख्या, शेतीचे झपाट्याने कमी होणारे प्रमाण, वनहक्क अधिकारांची पायमल्ली, घुसखोरी, सरकारचे बदलते व अन्याय्य धोरण याचे विपरीत परिणाम या जमातीवर होत आहेत. त्यात विविध सरकारी प्रकल्प कार्यन्वित करण्यासाठी होणारे विस्थापन हा देखील एक ज्वलंत प्रश्न या जमातीला भेडसावत आहे.
महादेव कोळी जमात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याचा महत्त्वाचा घटक आहे. या जमातीच्या परंपरा, जीवनशैली आणि समृद्ध इतिहास यांचा अभ्यास सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो.
महादेव कोळी जमाती समोरील आव्हाने :
महादेव कोळी ही जमात महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन आणि मौलिक आदिवासी जमात आहे. ही जमात हजारो वर्षांपासून निसर्गाशी समतोल राखून जीवन जगत आहे. मात्र, आधुनिक समाजाच्या विकास प्रक्रियेत त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या आव्हानांवर सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे.
आधुनिक विकास प्रकल्प जसे की धरणे, औद्योगिक विकास प्रकल्प यामुळे महादेव कोळी जमातीच्या भूमीवर अतिक्रमण होत आहे. त्यांच्या पारंपरिक जमिनी बळकावल्या जात आहेत. त्यामुळे त्यांना आपले घर, शेती आणि उपजीविकेची साधने गमवावी लागत आहेत. विस्थापित झाल्यावर त्यांना योग्य पुनर्वसन आणि भरपाई मिळत नाही.
आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवांची कमतरता आहे. मूलभूत आरोग्य सुविधा, रुग्णालये आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने अनेक जण साध्या आजारांमुळेही मृत्युमुखी पडतात. कुपोषण, मलेरिया, क्षयरोग, आणि जलजन्य आजार ही प्रमुख समस्या आहेत.
| Photo By Madhukar Bhangare Sir |
महादेव कोळी जमात ही प्रामुख्याने शेती, जंगल उत्पादने आणि मजुरीवर अवलंबून आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञान, संसाधनांची कमतरता आणि योग्य बाजारपेठ उपलब्ध नसल्याने उत्पन्न कमी आहे. त्यामुळे अनेकदा या जमातीतील बांधवांना आर्थिक शोषणाचा सामना करावा लागतो. जुन्नर तालुक्यातील बनकर फाटा, ओतूर, आळेफाटा येथे या शोषणाच्या घटना अनेकदा पोलिसांपर्यंत पोहचतात व यातून या जमातीतील बांधवांना सामाजिक संघर्षाला सामोरे जावे लागते.
जागतिकीकरण आणि आधुनिक जीवनशैलीमुळे आदिवासींच्या पारंपरिक प्रथा, संस्कृती, परंपरा, भाषा आणि जीवनशैलीवर मोठा परिणाम होत आहे. याला महादेव कोळी जमात देखील अपवाद नाही. या जमातीला स्वतःची ओळख गमावण्याची भीती निर्माण झाली आहे. याची विविध कारणे आहेत. त्याचे मूळ ब्रिटिशांनी लादलेल्या गुन्हेगारी जमात कायदा व वन कायदा यात आहे. या बाबी महादेव कोळी जमातीचे पारंपरिक हक्क व अधिकार गमावण्यास कारणीभूत आहेत.
महादेव कोळी जमातीचे संविधानिक हक्क जसे की वनहक्क कायदा (FRA) आणि पेसा कायदा यांची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यांच्या जमिनी, संसाधने आणि अधिकारांवर अतिक्रमण होत आहे. भंडारदरा परिसरातील हजारो वर्षांपासून वास्तव्यास असणाऱ्या लोकांना सरकारकडून नोटीस देऊन बंधने लादली जात आहेत. परंतु राजकीय पातळीवरही त्यांचे प्रतिनिधित्व कमी असल्याने हे अस्तित्वाचे मुद्दे दुर्लक्षित राहतात.
महादेव कोळी समाजाला अनेकदा सामाजिक भेदभाव आणि शोषणाचा सामना करावा लागतो. त्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळत नाही, तसेच इतर समाजांद्वारे उपेक्षित केले जाते.
महादेव कोळी समाजाचा जीवनमार्ग निसर्गाशी जोडलेला आहे. मात्र, वनीकरण, जंगलतोड आणि औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. यामुळे त्यांच्या उपजीविकेचे स्रोत नष्ट होत आहेत.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ महादेव कोळी समाजाला योग्यप्रकारे मिळत नाही. पुरेशी माहिती आणि साधनांची कमतरता यामुळे ते योजनांपासून वंचित राहतात. आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय एक राजूर, तर दुसरे घोडेगाव या ठिकाणी आहे. परंतु या कार्यालयांकडून पाहिजे तसे न्याय देणारे काम होत नाही. परिणामी महादेव कोळी समाज आज विकासापासून दूर ढकलला जात आहे.
काही भागांमध्ये मद्यपान आणि इतर व्यसनांच्या समस्या उद्भवलेल्या आहेत, ज्यामुळे महादेव कोळी जमातीचे वैयक्तिक आणि सामाजिक नुकसान होत आहे.
भंडारदरा, रतनवाडी, कळसूबाई, कुकडेश्वर, नाणेघाट, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर इत्यादी महादेव कोळी जमातीचे वास्तव्य असणाऱ्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पर्यटन वाढत आहे. या पर्यटनाच्या माध्यमातून काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न स्थानिक लोकांना मिळत असले, तरी त्या पर्यटनाच्या आडून वाढत चाललेली व्यसनाधिनता, चंगळवाद, लैंगिक शोषण, गुन्हेगारी याचे विपरीत परिणाम येणाऱ्या काळात महादेव कोळी जमातीला भोगावे लागणार आहेत.
महादेव कोळी जमातीचे वास्तव्य असणाऱ्या भागात इतर आदिवासी भागाच्या तुलनेत शिक्षण फार लवकर आले. त्यातून अनेक आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळांची स्थापना झाली. त्यातून अनेक पिढ्या घडल्या व त्याचे प्रतिबिंब महादेव कोळी जमातीच्या प्रगतीत दिसून येते. परंतु आज या भागातील शाळांची काय अवस्था हे काय आहे हे तपासले जात नाही. अनिल साबळे यांनी आपल्या डहान या कादंबरीतून येथील विदारकता मांडण्याची जी हिंमत दाखवली त्यावर महादेव कोळी जमातीतील इतर साहित्यिक, कार्यकर्ते, राजकीय व्यक्ती काम करताना दिसून येत नाहीत. परिणामी महादेव कोळी जमातीला अत्यंत निकृष्ट शिक्षण दिले जात असल्याने त्यांची आजची पिढी अत्यंत कमकुवत तयार होत आहे. याचे दूरगामी परिणाम येणाऱ्या काळात या जमातीच्या विकासावर पडणार आहेत. महादेव कोळी वस्ती असलेल्या भागात शिक्षण स्वातंत्र्यपूर्व काळात आलेले असले तरी आज मात्र शिक्षणातील महादेव कोळी जमातीतील मुलांचे प्रमाण घटत आहे. शाळा व महाविद्यालये यातून होणारे विद्यार्थी गळतीचे प्रमाण खूप मोठे आहे. त्यातही जे शिकतात त्यांची गुणवत्ता खालावलेली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अभावामुळे स्पर्धात्मक कार्यात मुलांना मागे राहावे लागत आहे, त्यामुळे रोजगाराच्या संधी कमी होत असून बेरोजगारी वाढत आहे.
महादेव कोळी जमातीचा समावेश हा आदिवासी (अनुसूचित जमाती) या गटात करताना क्षेत्रबंधन निर्धारित केले होते. परंतु राजकीय लोकांच्या मतलबी व स्वार्थी राजकारणामुळे सदर क्षेत्रबंधन उठविण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बोगस घुसखोरी या जमातीत झाली. यामुळे या जमातीच्या मूलभूत ओळखीवर परिणाम होत आहे. ही घुसखोरी रोखण्यासाठी डॉ. गोविंद गारे यांनी ज्या पद्धतीने काम केले, तसे निर्णायक काम होताना दिसून येत नाही.
महादेव कोळी जमातीसमोरील ही आव्हाने ही केवळ त्यांचीच नव्हे, तर संपूर्ण आदिवासी जमातींची आहेत. ही आव्हाने देशाच्या एकात्मतेची आणि विकासाची मोठी जबाबदारी आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षण, आरोग्यसेवा, आर्थिक प्रगती आणि सांस्कृतिक संवर्धन यासाठी विशेष धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी महादेव कोळी जमातीसाठी करणे अत्यावश्यक आहे. त्यांच्यासाठी न्याय, समानता आणि विकास यांची हमी देणे ही समाज म्हणून सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
- राजू ठोकळ, Aboriginal Publication z
alkari@yahoo.com
फोटो सौजन्य :
1) रविंद्र डगळे सर
2) मधुकर भांगरे सर
3) धर्मा दिघे सर
4) आकाश दांडेकर
5) रविराज भांगरे
6) Archive Records
संदर्भ :
1) सह्याद्रीतील आदिवासी : महादेवकोळी, डॉ. गोविंद गारे, 2007, तृतीय आवृत्ती, आदिम साहित्य प्रकाशन
2) आदिवासी विकासातील दीपस्तंभ, डॉ. गोविंद गारे, 2018, प्रथमावृत्ती, श्रीविद्या प्रकाशन
3) वासाहतिक महाराष्ट्रातील आदिवासिंचे उठाव, डॉ. विलास गवारी, 2023, प्रथम आवृत्ती, हरिती प्रकाशन
0 comments :
Post a Comment