सरकारी फाईलींच्या पानावर
आदिवासीचे नाव नाही,
तिथे आहे
गावच्या पाटलाचा जावई,
खिसा फाडणारा बाबू,
आणि बोगस वंशावळींची
गुलाबी चड्डी घातलेली पिलावळ.
खोट्या जमातीच्या दाखल्यात
ते आपल्या नोकऱ्या नव्हे अधिकार लुटतात,
आपल्या दिशाहीन नेत्यांच्या उरावर
ते स्वप्नांचे इमले बांधतात,
आणि सरकार
या सगळ्या चोरांना
गोठलेल्या दुधासारखं संरक्षण देतं.
आपण मात्र
या कुत्र्यांच्या थव्याला
देवाचा दरबार समजून
आपली ताटं पुढे करतो
जणू हाडावरच्या मांसाची परतफेड मिळेल.
अरे,
ही भूक फक्त पोटाची नाही,
ही भूक आहे
गेल्या पिढ्यांच्या
फाटलेल्या फुफ्फुसांतून येणाऱ्या किंकाळ्यांची.
पण आपण
त्याच खुर्चीला नमस्कार करतो,
जिथे आपल्या वडिलांच्या पाठीवरचे चाबकाचे व्रण
कुशन बनून लावलेले आहेत.
- राजू ठोकळ
Aboriginal Publication
0 comments :
Post a Comment