जीवन म्हणजे केवळ जगणे नव्हे, तर स्वतःमधील शक्यता शोधून समाजासाठी काहीतरी शाश्वत निर्माण करणे होय. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कधी ना कधी एक प्रश्न विचारतो आणि तो म्हणजे “मी कोणाचा आदर्श घ्यावा?” हा प्रश्न विशेषतः तरुण पिढीसाठी अधिक महत्त्वाचा आहे. कारण आपल्यासमोर दोन मार्ग असतात. यातील एक आहे टिकाऊ कृतीयुक्त बदल घडवणाऱ्यांचा आणि दुसरा क्षणिक लोकप्रियतेचा.
आजच्या काळात समाज माध्यमांच्या प्रकाशात काही लोक क्षणभर चमकतात. प्रसिद्धी, टाळ्या, फोटो, पुरस्कार या गोष्टी पाहून वाटतं की हाच यशाचा मार्ग आहे. पण मानसशास्त्र सांगते की “माणसाला जेव्हा बाह्य मान्यता मिळते, तेव्हा तो अंतःकरणातील ध्येय विसरतो.” म्हणजेच, जर आपला उद्देश फक्त लोकांची दाद मिळवणे असेल, तर आपल्या कृतींचं मूल्य काही काळापुरतंच टिकतं. हे मी स्वतः संघटनेत काम करून अनुभवले आहे. ज्यांना लोकांनी काही काळ डोक्यावर घेतलं, त्यांना आता लोकं काही क्षणिक भूमिकांमुळे विसरू लागले आहेत.
पण ज्यांनी आपल्या आयुष्याला समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतलं, त्यांचा प्रभाव पिढ्यान्पिढ्या टिकतो. इतिहास, भूगोल आणि मानववंशशास्त्र या तिन्ही क्षेत्रांतून याचे अनेक पुरावे आपल्याला दिसतात. विशेष म्हणजे समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेणाऱ्या व्यक्ती शक्यतो प्रसिद्धीपासून लांब असतात आणि माणसांचे मन वळविण्यासाठी ते विचारांचा, कृतीचा मार्ग अवलंबतात. निव्वळ भाषणबाजी किंवा घोकंपट्टी यापासून ते फार दूर राहतात.
इतिहास म्हणजे केवळ तारखा, युद्धे किंवा राज्यकर्त्यांची नावे नव्हे; तो म्हणजे मानवी संघर्ष, कृती आणि परिवर्तनाची गोष्ट होय.
बिरसा मुंडा यांचे उदाहरण घ्या. उणे २५ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आणि अन्यायकारक जमीन व्यवस्थेविरुद्ध आदिवासी समाजाला एकत्र केलं. आमच्या गावात आमचेच सरकार या एका विचारातून त्यांनी स्वातंत्र्य, निसर्गाशी नातं आणि आत्मसन्मान यांची बीजे पेरली.
त्यांची लोकप्रियता काही काळासाठी नव्हती; त्यांच्या कृतींची बीजं आजही आदिवासी आत्मभान जागृत करतात. हेच महानायक राघोजी भांगरे यांच्या चळवळीतूनही आपणास दिसून येते. त्यांनी कधीही मी हे केलं असं कोणाला सांगितलं नाही. उलटपक्षी सामान्य जनता त्यांना येऊन मिळत होती आणि आम्ही तुमच्यासोबत समाजासाठी काय करू असे विचारत होती.
त्याच्या उलट, आज समाजात चित्र आहे. आज असे अनेक नेते आहेत जे फक्त प्रसिद्धीसाठी आंदोलनात उतरतात; स्वतःच्या फायद्याचा लढा ते चालवतात. स्वतःचे हित साध्य झाले की मी समाजासाठी काय काय केले याची टिमकी वाजतात. म्हणून इतिहासातून आपण शिकले पाहिजे की, “बदलत्या काळाबरोबर समाजासोबत जो राहतो तो नेता आम्ही मोठा केला पाहिजे, जो निव्वळ स्वतःची टिमकी वाजवतो असा नव्हे.” दुर्दैवाने राघोजी भांगरे असो वा इतर अनेक क्रांतिकारकांकडून आम्ही हे शिकत नाही. आम्ही त्यांचा इतिहास देखील आमच्या सोयीने समाजाला सांगतो. म्हणून समाजाच्या हिताचा इतिहास मांडण्याची आज गरज आहे असे मला वाटते.
इतिहास म्हटला की भूगोल येतोच. आज पर्यंतचा बहुतांश इतिहास हा भूगोलाशी असणारी आपली नाळ अबाधित ठेवण्यासाठी घडवलेला आहे. आदिवासी इतिहास तरी तसाच आहे. भूगोलात सांगितलं जातं की निसर्गात फक्त तेच घटक टिकतात जे स्वतःला परिस्थितीनुसार बदलतात. नदी आपला मार्ग शोधते, पर्वत काळानुसार झिजतात पण त्यांच्या मुळाशी असलेली स्थैर्याची शक्ती टिकते.
तसंच आपल्या जीवनातही हेच लागू होतं. पण हे आम्ही शिकत नाही. उलट
पावसाळ्यातील छत्र्या अचानक उघडव्या तसे अचानक आमचे स्वयंघोषित नेते उगवतात. पण जसा पाऊस थांबताच त्या छत्र्यांचं अस्तित्व संपतं, तसंच आमच्या नेत्यांच्या बाबतीत घडते. टिकाऊ कृती म्हणजे काय असावी हे जर भूगोलातून शिकायचे असेल तर आपण नदीकडून खूप काही शिकू शकतो. नदी जी सतत वाहते, झिजते, पण समाजाला अन्न, पाणी आणि जीवन देते.
“भौगोलिक स्थैर्य म्हणजेच सामाजिक टिकाव,” असं भूगोलतज्ज्ञ Vidal de la Blache यांनी म्हटलं आहे.
याचाच अर्थ असा की जो माणूस परिस्थितीला स्वीकारून त्यातून कृती निर्माण करतो, तोच समाजात टिकतो. आमचे बहुतांश नेते समाजातील उणिवांचे भांडवल करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्या उणिवांसाठी कृतीयुक्त अजेंडा राबवत नाहीत.
मानववंशशास्त्र म्हणजे माणसाच्या उत्क्रांतीचा आणि सामाजिक रचनेचा अभ्यास होय. यामध्ये सांगितलं गेलं आहे की “संस्कृती टिकवते ते तिचं मूल्य आणि कृती; नुसता गाजावाजा नव्हे.”
उदाहरणार्थ, आदिवासी समाजाने हजारो वर्षे निसर्गाशी सुसंगत जीवनशैली टिकवली आहे. शेती, शिकार, नृत्य, निसर्ग पूजा, लोककला या सर्व कृतींमधून दीर्घकालीन संस्कृती जपली गेली आहे. लोकप्रियतेच्या लाटांवर चालणारे लोक या संस्कृतीला कधीच समजू शकत नाहीत, कारण त्यांचे मूळात याच्याशी नातं नसतं. ते फक्त या गोष्टी जपल्या पाहिजेत म्हणून वरवर बतावणी करत असतात. प्रत्यक्ष निर्णायक गोष्टी करण्याची वेळ येते तेव्हा हेच आपली विचारधारा पायदळी तुडवतात. आदिवासी समाजात ज्या व्यक्तींनी लोकशिक्षण, जलसंवर्धन, वनसंरक्षण, आणि आरोग्यविषयक कार्य केलं, त्यांनी टिकाऊ बदल घडवले. ते आजही लोकांच्या स्मरणात आहेत. अगदी त्यांचे पूजन देखील केले जाते. सह्याद्रीतील महादेव कोळी जमातीत बहिरोबा या देवाचे पूजन केले जाते. बहिरोबा ही खरंतर ग्रामरक्षक देवता आहे. तिचे आद्यपुरुष म्हणून पूजन होणे हे खूप काही सांगून जाते. पण हे का होत आहे याच्या मुळाशी आम्ही जात नाही. ही मूल्ये शोधण्याची आज गरज आहे. आदिवासी समाजातील जंगल सत्याग्रह, महादेव कोळी, भिल आणि गोंड आंदोलने किंवा मध्य भारतातील वनहक्क लढे ही नेमकी कशाचे द्योतक आहेत हे मांडण्यात आम्ही शिकूनही कमी पडत आहोत आणि म्हणूनच आज आदिवासींच्या चळवळी बाहेर इतकं रणकंदन होत असतानाही मोठा सामाजिक लढा उभा करू शकत नाहीत. छोटी मोठी आंदोलने करून एकदिवसीय गर्दी जमवणे म्हणजे निर्णायक चळवळ नव्हे हे आम्ही समजून घेतले पाहिजे व मान्यही केले पाहिजे.
आदिवासींचा अभ्यास करणाऱ्या बहुतांश इतिहासतज्ञ, भूगोलतज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ यांना वाटते की आदिवासी हे सर्व कृतीशील लोक आहेत. त्यांचे कार्य, संस्कृती ही निव्वळ क्षणिक आदर्श नाही, तर शाश्वत आहे. याच मौलिकतेतून कोंभाळणे येथील राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशी लाखो उदाहरणे देता येतील. त्यातून जगाने प्रेरणा घेतली आहे यात शंका नाही. पण आदिवासी यातून नक्की काय शिकले हे तपासणे राहून गेलेले आहे असे मला वाटते.
मानसशास्त्र सांगते कृतीनेच आत्मसन्मान वाढतो
मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांनी सांगितले की “मानवी विकासाचा सर्वोच्च टप्पा म्हणजे स्व-प्राप्ती (self-actualization)”, म्हणजे स्वतःच्या क्षमतेचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करणे.
जर आपण फक्त टाळ्या मिळवण्यासाठी काम केलं, तर तो अहंकार आहे; पण जर आपण समाजाच्या उन्नतीसाठी काम केलं, तर तो आत्मसन्मान आहे. आपल्या आदिवासी भागात अनेक तरुण असे आहेत जे शिक्षण घेऊन गावात परत येतात आणि मुलांना शिकवतात, महिलांना बचत गटांशी जोडतात, शेतीत नवे प्रयोग करतात. ते सोशल मीडियावर प्रसिद्ध नसतील, पण त्यांच्या कृतींनी अनेक आयुष्यं बदलत आहेत. हेच खरे मानसशास्त्रीय समाधान आहे “आपण इतरांसाठी उपयुक्त आहोत” या जाणिवेचं समाधान आमच्या सामाजिक पातळीवर काम करणाऱ्या मित्रांना लाभते का हे तपासले पाहिजे.
आदिवासी समाजात आज अनेक स्थानिक नेते उदयास आले आहेत. त्यांनी आपली लोकप्रियता नव्हे, तर कृतीयुक्त सामाजिक नाळ कायम जपली पाहिजे. ममताबाई भांगरे सारख्या महिला आज सेंद्रिय शेती, बियाणे बँक आणि महिला स्वावलंबनासाठी कार्यरत आहेत. मला वाटते त्यांनी प्रकाशझोतात येण्यासाठी नव्हे, तर समाजात बीज रुजवण्यासाठी काम केलं. त्यांच्या कृतींमुळे अनेक पिढ्या प्रेरित होत आहेत. यातून खरा समाज घडवला जात आहे आणि हाच खरा शाश्वत विकास आहे.
आजचा तरुण सोशल मीडियातील रील्स, व्हिडिओ, पोस्ट आणि फॉलोअर्समध्ये गुंतलेला आहे. मानसशास्त्रज्ञ एरिच फ्रॉम म्हणतात “आधुनिक माणूस दिसण्यात गुंतला आहे, असण्यात नाही.”
याचा अर्थ आपण आपली ओळख बाह्य प्रमाणांवर शोधतो, पण अंतर्गत मूल्ये हरवत आहोत. क्षणिक लोकप्रियता म्हणजे फुगलेल्या बेडकासारखी अवस्था आहे. यात तो बेडूक मोठा दिसतो पण आत हवा असते; टिकाऊ कृती म्हणजे मातीचा दिवा जो छोटा असला तरी प्रकाश देतो हे आपण समजून घेतले पाहिजे.
आदिवासी मुलांना सांगावेसे वाटते की तुमच्या अंगात जग बदलण्याची ताकद आहे. तुमचे पूर्वज जंगल जपणारे, निसर्गाशी एकरूप जीवन जगणारे आणि अन्यायाविरुद्ध लढणारे होते.
त्यांचा आदर्श म्हणजे कृती आणि स्वाभिमान होय. आज तुम्हाला शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान या माध्यमांतून नवी ओळख निर्माण करायची आहे. पण त्याच वेळी, तुमचा आदर्श लोकप्रियतेवर नव्हे, तर टिकाऊ बदलावर असावा.
लोकप्रिय होण्यासाठी मोठे कपडे, मंच किंवा कॅमेरे लागत नाहीत; पण परिवर्तनासाठी लागतो निर्भय विचार आणि सतत कृतीचा संकल्प. याचे भान आपण ठेवले पाहिजे.
शेवटी एक मात्र खरं आहे की, “जे टिकतं तेच खरं. जे झळकतं किंवा जे थोड्या कालावधीसाठी प्रसिद्ध पावते ते खरं असेलच असं नाही.” म्हणून मित्रांनो, पावसाळ्यात उघडणाऱ्या छत्र्यांसारख्या क्षणिक प्रसिद्धीचा मोह टाळा. बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, भीमा नाईक, जयपालसिंग मुंडा, रुख्मिणी खाडे आणि तुमच्या गावातील काही प्रामाणिक कार्यकर्ते या सगळ्यांकडून शिकण्यासारखं म्हणजे कृती, सातत्य आणि ध्येयाची जाणीव होय. जीवनात असा आदर्श घ्या, जो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी नव्हे तर इतरांना प्रकाश देण्यासाठी, बळ देण्यासाठी संघर्ष करतो. मला वाटते, लोकप्रियता वाऱ्यासारखी असते. ती येते आणि जाते; पण कृती म्हणजे वृक्ष होय. जो आपली मूळं या मातीत रुजवून पिढ्यानपिढ्या सावली देतो.
राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment