भारतीय लोकशाहीचे ढासळते स्वरूप...



भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी आणि प्रगल्भ लोकशाही म्हणून गौरवली जाते. परंतु आज या लोकशाहीची मुळंच हादरलेली दिसत आहेत. स्वातंत्र्य, समानता आणि न्याय या संविधानिक मूल्यांचा पाया राजकीय स्वार्थ, भ्रष्टाचार आणि धर्मांधतेच्या भेगांमधून झिरपून कमजोर होत चालला आहे. कधी काळी लोकशाही म्हणजे नागरिकांचा सन्मान आणि अधिकारांचे रक्षण मानले जात असे, परंतु आज ती केवळ सत्तेच्या मक्तेदारीचा मुखवटा बनून राहिली आहे.

आज परिस्थिती अशी आहे की सत्य बोलणं गुन्हा ठरत आहे, विवेक वापरणं देशद्रोह ठरत आहे आणि शांततेने आंदोलन करणे हे राष्ट्रविरोधी कृत्य समजले जात आहे. सोनम वांगचूक यांसारख्या शांततामय कार्यकर्त्याला अटक होते, असीम सरोदे यांची सनद रद्द केली जाते, तर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रामाणिक व्यक्तींना खोट्या आरोपांत अडकवून समाजातून मोडीत काढले जाते. या घटनांनी भारतीय लोकशाहीचा चेहराच उघडा पाडला आहे. तो चेहरा ज्यावर लोकांनी विश्वास ठेवला होता, पण त्याने त्यांचाच विश्वासघात केला आहे.

भारतीय राजकारणाचे आजचे स्वरूप हे सत्तेच्या, पैशाच्या आणि स्वार्थाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे. पक्ष फोडणे, नेते खरेदी करणे, विरोधकांना बदनाम करणे आणि जनतेच्या मुद्द्यांऐवजी वैयक्तिक सूडाचे राजकारण करणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. आज एकाच घरात खासदार, आमदार, नगराध्यक्ष आणि सत्ताधारी पदे असतात. एकाच घरातील लोकांकडे विविध जातींचे दाखले आहेत, ज्याद्वारे ते निवडणुकीत आरक्षणाचा गैरवापर करून सत्तेवर कब्जा करतात. हा केवळ अन्याय नाही, तर लोकशाहीची उघडी लूटमार आहे.

राजकारणातील ही नैतिक अधोगती इतकी प्रबळ झाली आहे की, सत्य व प्रामाणिकतेसाठी लढणाऱ्या व्यक्ती एकेक करून नष्ट केल्या जात आहेत. माध्यमं सत्तेच्या दबावाखाली झुकली आहेत, न्यायालयीन प्रणालीवर संशय निर्माण होतो आहे आणि नागरिकांचा विश्वास दररोज कमी होत आहे.

या सर्वांमध्ये सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे वाढती धर्मांधता होय. धर्म, जो माणसाला माणसाशी जोडतो, तो आज लोकांना विभागण्याचे सर्वात प्रभावी हत्यार बनला आहे. धर्माच्या नावाने राजकारण फोफावत आहे, समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे आणि विचारस्वातंत्र्यावर नवी बंधनं लादली जात आहेत. एकेकाळी विविधतेत एकता हा भारताचा आत्मा मानला जायचा, पण आज ती विविधता सत्तेच्या रणनीतीसाठी विभाजनाचं शस्त्र बनली आहे.

शाळांमध्ये, विद्यापीठांत, माध्यमांत आणि समाजमाध्यमांवर विचारांवर नियंत्रण ठेवले जात आहे. असहमती मांडणाऱ्या व्यक्तींना देशद्रोही ठरवले जात आहे. लोकशाहीच्या आत्म्याला विचारस्वातंत्र्य हे सर्वात मोठे बळ असते. पण तेच आज नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धर्माच्या नावाने, जातीनुसार आणि राजकीय निष्ठेनुसार लोक एकमेकांविरुद्ध उभे केले जात आहेत.

भारतीय संविधान हे जगातील सर्वाधिक समावेशक आणि न्यायप्रिय संविधान मानले जाते. परंतु आज संविधानावर श्रद्धा ठेवणाऱ्या नागरिकांची संख्या घटते आहे. न्यायालयीन निकालांचा राजकीय वापर, तपास संस्थांचा पक्षपातीपणा आणि माध्यमांचा एकतर्फी प्रचार या सर्व गोष्टी एकत्रितपणे लोकांच्या मनात संशय निर्माण करत आहेत आणि प्रश्न निर्माण होतो की ही न्यायव्यवस्था खरोखर स्वतंत्र आहे का?

एका बाजूला न्याय उशिरा मिळतो आणि दुसऱ्या बाजूला सत्ता व संपत्ती असलेल्यांना तो सहज मिळतो. या विषमतेमुळे लोकशाहीचा आधार असलेला न्यायावरचा विश्वास कोसळत आहे. अशा वेळी जनतेच्या मनात नैतिकता आणि कायद्यापेक्षा असंतोष वाढत आहे आणि तेच कोणत्याही क्रांतीचे बीज असते.

इतिहासात पाहिले तर, जेव्हा जेव्हा सत्ताधारी वर्गाने लोकांच्या विवेकावर गदा आणली, तेव्हा तेव्हा जनतेने क्रांती केली. फ्रेंच क्रांती (1789) मध्ये राजघराण्याची विलासिता, अन्याय आणि गरीब जनतेवरील करांनी त्रस्त झालेल्या लोकांनी स्वातंत्र्य, समानता, बंधुता या घोषवाक्याखाली विद्रोह केला. त्या क्रांतीने केवळ फ्रान्स नव्हे, तर संपूर्ण जग बदलले. रशियन क्रांती (1917) मध्ये कामगार, शेतकरी आणि सैनिकांनी झारच्या हुकूमशाहीविरुद्ध उठाव केला. त्या क्रांतीने दाखवून दिले की, शोषणावर आधारित सत्ता जास्त काळ टिकू शकत नाही. तसेच अमेरिकन नागरी हक्क चळवळ (1960 च्या दशकात) काळ्या लोकांवरील भेदभावाविरुद्ध होती. मार्टिन ल्यूथर किंग यांनी मानवी सन्मानासाठी लोकांना उभं केलं. अरब स्प्रिंग (2010-12) ही आधुनिक काळातील क्रांती होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांनी हुकूमशाही सरकारांविरुद्ध आंदोलन उभारले. ट्युनिशिया, इजिप्त, लिबिया, श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ यासारख्या देशांतून शासन उलथून पडले. या सर्व क्रांत्यांचा मूलभूत संदेश एकच होता आणि तो म्हणजे जेव्हा सरकार लोकांच्या विवेकावर हल्ला करते, तेव्हा लोक विद्रोह करून उठतात.

आज भारतात दिसणारे संकेत हे धोक्याचे घंटानाद आहेत. विचार मांडणं गुन्हा ठरतो आहे, धार्मिक ध्रुवीकरण राजकीय सत्तेसाठी वाढवले जात आहे आणि सत्तेवर टीका करणाऱ्यांना तुरुंगात डांबले जात आहे ही परिस्थिती लोकशाहीच्या मृत्यूची पूर्वपीठिका आहे.

आपला देश अशा दिशेने जात आहे जिकडे मतभेद म्हणजे देशद्रोह, पत्रकार म्हणजे प्रचारक आणि नागरिक म्हणजे केवळ मतदार असे चित्र निर्माण झालेले आहे. धर्म, जाती आणि प्रदेशांच्या नावाने निर्माण होणारे संघर्ष हे समाजाला आतून पोखरत आहेत. या परिस्थितीत जर लोकांनी विवेक गमावला, तर येणारा काळ लोकशाहीचा नाही, तर एकाधिकारशाहीचा असेल. वास्तविक एकाधिकारशाही रुजली आहे याची जाणीव जनतेला होत नाही हेच मुळात दुर्दैवी आहे.

लोकशाही ही केवळ मतदानाचा अधिकार नाही, तर ती जबाबदारी आहे प्रश्न विचारण्याची, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि विवेक जागा ठेवण्याची. आज आपणच त्या जागृतीपासून दूर गेलो आहोत. विकास या शब्दाच्या आड लपलेल्या सत्तेच्या रणनीतीला आपण ओळखत नाही. जनतेने जर प्रश्न विचारणं थांबवलं, तर सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही वाढते हे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच आज गरज आहे ती जागरूकतेची, विवेकाची आणि एकजुटीची. समाजाने आपल्या अंतःकरणापासून विचार केला पाहिजे की, आपण या व्यवस्थेचे अंध अनुयायी आहोत का, की बदलाचे पाईक?

भारतीय लोकशाही आज एका धोकादायक वळणावर उभी आहे. नैतिकता, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि स्वातंत्र्य हे चार स्तंभ ढासळू लागले आहेत. परंतु अजूनही उशीर झालेला नाही. लोकशाही वाचवायची असेल, तर भीती नव्हे, विवेक जागा ठेवावा लागेल. कारण भीतीतून सत्ता जन्म घेते, पण विवेकातून समाज जिवंत राहतो. आज प्रत्येक भारतीयाने स्वतःला विचारले पाहिजे की, मी सत्तेच्या प्रचाराने झोपलेला नागरिक आहे का, की प्रश्न विचारणारा जिवंत नागरिक?

लोकशाही म्हणजे केवळ शासन पद्धती नव्हे, ती जनतेच्या आत्म्याची अवस्था असते. जेव्हा आत्मा झोपतो, तेव्हा हुकूमशाही जागी होते. ती हुकूमशाही जन्माला येण्याअगोदर आम्हाला जागे होण्याची गरज आहे. येणाऱ्या सर्वच निवडणुकांत आपला विवेक आणि अस्मिता जागृत ठेऊन काम केले, तर परिस्थिती बदलण्यात आपण आपले थोडेफार योगदान देऊ शकणार आहोत. पण जर आपण निव्वळ पक्षीय निष्ठा जोपासण्यात धन्यता मानणार असू, तर मग मात्र लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार देखील येणाऱ्या काळात गमावणार आहोत. 

शेवटी इतकेच म्हणावेसे वाटते अंधार फार झाला 🪔 पणती जपून ठेवा. 

Aboriginal Publication

#भारतीयलोकशाही #DemocracyInCrisis
#लोकशाहीकीवेदना #विवेकजागाठेवा
#VoiceOfConscience #राजकारणातीलअधःपतन
#RiseOfAuthoritarianism #धर्मांधतेचाधोका
#IndianPoliticsReality #संविधानवाचवा
#FreedomOfThought #IndianDemocracyAtCrossroads
#सामाजिकचिंतन #लोकशाहीपासूनलोकांधशाहीकडे
#WakeUpIndia #जनतेचास्वर
#सत्ता_की_लोकशाही #विचारस्वातंत्र्य
#BharatForJustice #StopReligiousHatred 
#BeTheChange #IndiaAwakening
#CitizenRevolution #विवेकाचीक्रांती



0 comments :

 

Coming Soon

Coming Soon

Coming Soon

Coming Soon

आदिवासी विचार

आदिवासी विचार म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनमूल्ये, संस्कृती, परंपरा, आणि जगण्याच्या पद्धती यांचा अभ्यास व त्यांचे महत्त्व. आदिवासी समाज हा निसर्गाशी अत्यंत जवळचा असल्यामुळे त्यांच्या विचारसरणीत निसर्गसंवर्धन, सहजीवन, सामूहिकता आणि श्रमाला महत्त्व असते. आदिवासी विचार हे केवळ जीवनशैलीचे प्रतिबिंब नसून, समग्र मानवतेला शाश्वत जीवनाची शिकवण देतात.

Trending Posts




माती, बीज आणि ममता

माती, बीज आणि ममता




Followers

Total Pageviews

Contact Form

Name

Email *

Message *

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा





Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9595959357 .

© Aboriginal Publication. You are not allowed to publish the content from this blog without permission.

Aboriginal Publication is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find information about book publication.