शिकणं?
कशासाठी?
भुकेल्या पोटात ढकलायचं तुमचं राष्ट्रप्रेम?
की उगाळायचं मुख्य प्रवाह नावाचं थडगं
आमच्या उघड्या पाठीवर?
आमच्या शाळा
म्हणजे जणू भिंती आहेत ओसाड रानाच्या,
गुरूजी
अर्ध्या अधिक विषयांना नसतातच बहुतेक,
जे आहेत ते जातात ऑन ड्युटीवर,
आणि आमची मुलं
गणिताच्या ऐवजी भिंतीवरील चित्रात भविष्य शोधतात,
वाचनाऐवजी शाळेच्या उपक्रमांसाठी फक्त मॉडेल ठरतात.
तुमचं शिक्षण
ते आमच्यासाठी नव्हतंच कधी,
काळ्या फळ्यावर आमच्या इतिहासाचा रंगच नव्हता.
पाने वाच म्हटलं की
आम्ही खरोखर पानं वाचायचो
करवंद, साल, मोह, तेंदू...
कारण पुस्तकं येतच नव्हती
आणि ती यावी म्हणून धडपडणारे हात आजही तसे कमीच.
आम्ही शिकायला लागलो,
तेव्हा धास्तावलात तुम्ही
हे हात जर लिहू लागले,
तर काढतील जखमांवरील खपल्या
त्यातून जे भळाभळा रक्त वाहिल
ते हिशोब करील अरण्य रुदनाचा!
त्यातच आम्ही तुमची भाषा शिकावी म्हणून,
धिंडवडे काढलेत तुम्ही आमच्या बोलीचे,
आणि ठेवलं आमचं ज्ञान लोककथा म्हणून संग्रहालयात.
शिक्षणासाठी आम्ही लढतोय
कुंचल्यांतून नाही,
तर पाण्याच्या ओहोळातून,
दगडांतून, कारवीच्या झोपडीतून
आणि भात खाचरांतून
पण त्यासाठी आपटून घ्यावं लागतंय
उंचावरून पडणाऱ्या धबधब्यासारखं हजारदा.
कारण शिकलेलं आदिवासी मूल
पुस्तकातून उगम शोधेल
आपल्या मुळांचा, संघर्षाचा, इतिहासाचा.
ते तुम्हाला विचारेल जाब
तू मला वनवासी का म्हणतोस?
कारण माझ्या नसांतूनच तर वाहतोय
या भूमीचा आदिम नाद!
- राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment