डोंगरावरच्या पाऊलवाटेतल्या धुळीत
आमचं रक्त कधी पासून सुकतंय
डोंगरावरचं सोनकीचं फुल
तुझ्या भाषणानं वाळलंय
तू नेता म्हणे!
पण तुझं नेतृत्व म्हणजे
वाघाची कातडी पांघरलेला कुत्रा
गावातून शहरात पोसलेला
मगरमिठीच्या पाण्यात लोळणारा
तुझी भाषा
शहरातील हॉटेलातला गरम सूप
आणि आमची भूक
रानातल्या कावळ्यांनी उचलून नेलेली भाकरी
इथं पोरं
उन्हात चर्रं आवाज करीत भाजतात
आईच्या डोळ्यात
आनंदाश्रूऐवजी तुटलेले स्वप्न आहे
बापाच्या हातात
मातीऐवजी फक्त पोकळ फावड्याचा दांडा आहे
तू मात्र
शहराच्या मऊ गालिच्यांवर बसून
आमचं दिशाहीन रान मोजतोस
जणू ते तुझ्या बँक खात्यातलं आकडं आहेत
आणि आम्ही अजूनही
ढगांकडे बघत राहतो
पाऊस यावा
कणग्या भराव्यात
तुझ्या खुर्चीला आग लागावी
आणि व्यवस्थेला जाग यावी म्हणून
- राजू ठोकळ
Aboriginal Publication
1 comments :
निर्भीड लेखन ✌️
Post a Comment