इतिहास केवळ राजे, युद्धे आणि सत्तांतरांनी घडत नाही. एखाद्या राजसत्तेच्या पाठीशी कोणता समाज उभा होता, त्या समाजाचे डोंगर-जंगलाशी नाते कसे होते, त्याची उपजीविका, श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक व्यवहार कसे होते, हे समजून घेतल्याशिवाय इतिहासाचे पूर्ण चित्र उभे राहत नाही. जव्हारचे महाराजा यशवंतराव लिखित Jayaba अर्थात जायबा या ग्रंथाकडे याच व्यापक दृष्टीने पाहावे लागते. १९७० मध्ये प्रथम प्रकाशित झालेला हा ग्रंथ जव्हार संस्थानाच्या संस्थापक जायबा यांच्या जीवनाभोवती आकार घेतो आणि त्यातून जव्हारच्या डोंगरमुलुखाचे राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जग उलगडत जाते.
जायबाचे वैशिष्ट्य म्हणजे हा इतिहास बाहेरच्या प्रवाशाच्या किंवा वसाहतकालीन अधिकाऱ्याच्या नजरेतून लिहिलेला नाही. जव्हारच्या राजघराण्याचे वंशज असलेल्या महाराजा यशवंतरावांनी आपल्या पूर्वजांची कथा मांडली आहे. लेखकाने ऐतिहासिक नोंदी, उपलब्ध कागदपत्रे आणि कुटुंबातील व्यक्तींकडून प्राप्त माहितीचा आधार घेतल्याचे प्रस्तावनेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे या ग्रंथाकडे आधुनिक अभिलेखीय इतिहास म्हणून नव्हे, तर जव्हारच्या राजघराण्यात जतन झालेल्या ऐतिहासिक स्मृतीचे लिखित रूप म्हणून पाहणे अधिक उचित ठरते.
ग्रंथाच्या केंद्रस्थानी जायबा असला, तरी त्याच्या भोवती उभा राहणारा भूगोल तितकाच महत्त्वाचा आहे. मुखणे, नाशिक, जव्हार, सह्याद्रीच्या डोंगररांगा, जंगल, घाटमार्ग आणि किल्ले यांच्या सान्निध्यात ही कथा आकार घेते. मुखणे हे नाशिकच्या दक्षिणेकडील डोंगरी गाव म्हणून कथेत समोर येते. या भौगोलिक चौकटीकडे महादेव कोळी समाजाच्या इतिहासाच्या संदर्भात पाहिले, तर डोंगर आणि राजसत्ता यांच्यातील संबंध विशेष लक्षवेधी ठरतो. डोंगर हा येथे केवळ निसर्ग नाही; तो संरक्षण आहे, उपजीविका आहे, सामाजिक अवकाश आहे आणि राजकीय स्वायत्ततेला आकार देणारी भौगोलिक शक्तीही आहे.
जायबाचे महत्त्व केवळ राजकीय इतिहासापुरते मर्यादित राहत नाही. गावातील बाजारपेठ, धान्य-कडधान्यांचे व्यवहार, शेती, पावसावरील अवलंबित्व, पशुपालन, यात्रा, देवस्थाने, भोजनपद्धती, विवाह आणि सामुदायिक व्यवहार यांचे अनेक तपशील कथानकात विखुरलेले आहेत. नदीकाठी जाणाऱ्या स्त्रिया, घरगुती भांडी, स्नान, विवाहाची चर्चा, देवीची पूजा आणि जत्रेतील लोकजीवन अशा नोंदीही तत्कालीन समाजाच्या दैनंदिन जीवनाकडे नेणाऱ्या खिडक्या ठरतात. त्यामुळे हा ग्रंथ एका राजाचे चरित्र सांगता सांगता डोंगरी समाजाच्या सामाजिक इतिहासाचे अनेक तुकडे जतन करतो.
महादेव कोळी इतिहासाच्या अभ्यासासाठी ही बाब विशेष महत्त्वाची ठरते. एखाद्या समाजाचा इतिहास शोधताना केवळ त्याच्या नावाच्या स्पष्ट उल्लेखांवर अवलंबून राहता येत नाही. त्या समाजाच्या पारंपरिक भौगोलिक परिसरातील सत्ता, वस्ती, शेती, किल्ले, धार्मिक स्थळे, जंगलाचा वापर, सामाजिक संबंध आणि सांस्कृतिक व्यवहार यांचाही तुलनात्मक अभ्यास करावा लागतो. त्या दृष्टीने जायबा जव्हारच्या महादेव कोळी राजपरंपरेभोवती असलेल्या सामाजिक आणि भौगोलिक जगाची पार्श्वभूमी समजून घेण्यास मदत करतो.
या पुस्तकातील निसर्गवर्णन तर स्वतंत्रपणे अभ्यासण्यासारखे आहे. डोंगराळ प्रदेश, पावसाळ्यात काही भागांचा बाह्य जगाशी तुटणारा संपर्क, जंगल, वन्यजीव, बांबू, साग, भातशेती आणि पर्वतीय मार्ग यांचे वर्णन येते. त्र्यंबक, ब्रह्मगिरी, हरिहर आणि हरिश्चंद्रगड यांसारख्या पर्वतीय स्थळांच्या उल्लेखांमुळे कथानकाचा सांस्कृतिक भूगोल अधिक विस्तारतो. महादेव कोळी समाजाच्या इतिहासाकडे मानववंशशास्त्रीय दृष्टीने पाहताना हा भूगोल महत्त्वाचा ठरतो. कारण डोंगर, जंगल, पाऊस आणि शेती यांनी येथील जीवनपद्धती घडवली; त्याचबरोबर किल्ले, मार्ग आणि नैसर्गिक संरक्षणामुळे स्थानिक सत्तासंरचनांनाही विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले.
ग्रंथात वेगवेगळ्या डोंगरी आणि आदिवासी समूहांचे स्वतंत्र उल्लेखही आढळतात. यामुळे जव्हारचे राज्य एका निर्वात पोकळीत निर्माण झाले नव्हते, हे स्पष्ट होते. विविध आदिवासी समूह, स्थानिक सत्ताकेंद्रे आणि डोंगराळ भूगोल यांच्या परस्परसंबंधातून हा प्रदेश घडत होता. महादेव कोळी राजसत्तेचा अभ्यास म्हणूनच केवळ राजघराण्याच्या वंशावळीपुरता मर्यादित ठेवता येत नाही; जव्हारच्या व्यापक आदिवासी सामाजिक अवकाशात तिचे स्थान शोधावे लागते.
या पुस्तकामागची आणखी एक भावना महत्त्वाची आहे. बदलत्या काळात जव्हारच्या प्राचीन परंपरा वेगाने नाहीशा होत असल्याची चिंता लेखकाने प्रस्तावनेत व्यक्त केली आहे. त्या परंपरा आणि स्मृती पुढील पिढ्यांसाठी टिकून राहाव्यात, अशी त्याची भूमिका दिसते. म्हणून जायबा हा केवळ पूर्वजांच्या पराक्रमाचे स्मरण करणारा ग्रंथ राहत नाही. तो एका समाजाच्या सांस्कृतिक विस्मरणाविरुद्ध उभा केलेला लिखित दस्तऐवजही ठरतो. राजवाडे आणि किल्ले टिकले तरी त्यांच्यामागची माणसे, त्यांच्या परंपरा आणि त्यांची सामाजिक स्मृती नष्ट झाली, तर इतिहासाचा केवळ सांगाडा उरतो. जायबा त्या सांगाड्याला मानवी जीवनाचे संदर्भ देतो.
अर्थात, या ग्रंथाचे वाचन चिकित्सकपणे करावे लागेल. जायबा यांच्या काळातील घटनांचे वर्णन अनेक शतकांनंतर प्रकाशित झालेल्या पुस्तकात येते आणि लेखक स्वतः त्या राजपरंपरेचा वंशज आहे. त्यामुळे राजवंशीय स्मृती, मौखिक परंपरा आणि पूर्वजांविषयीचा अभिमान कथनात असणे स्वाभाविक आहे. म्हणून जायबामधील प्रत्येक प्रसंगाला समजून घेताना समकालीन ऐतिहासिक शिलालेख, सनदा, गॅझेटिअर, जनगणना अहवाल आणि मानववंशशास्त्रीय साहित्याशी तुलना केली, तर या पुस्तकाच्या मदतीने खूप मोठा ऐतिहासिक वारसा आपल्यासमोर अधिक ताकदीने उभा राहील. अशा तुलनात्मक वाचनातूनच महादेव कोळी राजसत्ता आणि जव्हारचा इतिहास देखील अधिक भक्कमपणे उलगडू शकतो.
जायबा वाचून पुस्तक मिटवताना स्मरणात केवळ एक राजा राहत नाही. त्याच्या मागे सह्याद्री उभा राहतो; जव्हारचा किल्ला दिसतो; जंगल, पाऊस, शेती, बाजारपेठ, देवस्थाने आणि डोंगरी वस्त्यांचे जग आकार घेते. त्या सर्वांच्या केंद्रस्थानी एक राजकीय आणि सांस्कृतिक परंपरा दिसते. म्हणून जायबाचे महत्त्व एका व्यक्तीच्या चरित्रापेक्षा व्यापक आहे. जव्हारच्या महादेव कोळी राजपरंपरेचा इतिहास समजून घेताना त्या इतिहासाला जन्म देणारा डोंगर, जंगल, समाज आणि सांस्कृतिक अवकाश समजून घेण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वाची वाट दाखवतो.
इतिहासात अनेकदा सत्ताधाऱ्यांची नावे टिकतात आणि समाजाच्या आठवणी हरवतात. जायबा या पुस्तकाची जमेची बाजू अशी की राजाची कथा सांगताना त्यात त्या राजाच्या भोवतालच्या डोंगरमुलुखाचीही स्मृती जतन केली आहे. म्हणून महादेव कोळी समाजाच्या इतिहासाचा शोध घेताना जायबाकडे केवळ राजचरित्र म्हणून पाहणे पुरेसे नाही; जव्हारच्या महादेव कोळी राजसत्तेची राजकीय स्मृती, डोंगरी जीवनाचा सामाजिक पट आणि सह्याद्रीच्या आदिवासी सांस्कृतिक भूगोलाला जोडणारा संदर्भग्रंथ म्हणून त्याचे चिकित्सक वाचन करणे अधिक अर्थपूर्ण ठरेल.
सदर ग्रंथ इंग्रजीत असल्याने ज्या जमातीशी निगडित हा इतिहास वा ज्या भागातील हा वारसा आहे, त्या भागातील लोकांना समजण्यास अडचणी आहेत. या ग्रंथाची मराठी आवृत्ती आल्यास जव्हार संस्थानच्या इतिहासात मोलाची भर पडण्यास नक्की मदत होईल.
- राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment