जगाच्या गजबजाटात काही माणसं अशी भेटतात, जी केवळ नावापुरती नसतात; ती एक अनुभव असतात, एक प्रवास असतात आणि काही वेळा, ती आपल्याला आपलंच अस्तित्व नव्यानं शोधायला भाग पाडतात. माझ्यासाठी असंच एक नितळ, शांत आणि गूढ झऱ्यासारखं व्यक्तिमत्त्व म्हणजे – श्री एकनाथ बुरसे सर.
सन २००६-२००७ मध्ये मी टिळक कॉलेजमध्ये बी.एड. करत होतो. तेव्हा अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शाळेत जाऊन पाठ घ्यावे लागत असत. त्या उपक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माझं जाणं झालं. माझ्या वर्गातील विकास पढेर याने सहज सांगितलं – "इथले बुरसे सर भारी आहेत." त्या क्षणी त्या नावाभोवती एक अदृश्य वलय निर्माण झालं. विकास पढेर हे त्याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असल्याने त्यांनी बुरसे सरांविषयी अनेक अनुभव सांगितले. एखादे पुस्तक वाचावे, तसे ते सर्व अनुभव होते. ‘एकनाथ बुरसे’ हे केवळ एक नाव नव्हतं, तर एक प्रामाणिकतेचा, सात्त्विकतेचा आणि सामाजिक जाणिवेचा झरा बनून मनाच्या कोपऱ्यात रुजू झालं.
माझे बी.एड. झाले. निकाल लागल्यावर अगदी काही महिन्यात ओतूरच्या शाळेत रुजू झालो आणि तिथेही त्या नावाची पुन्हा आठवण झाली. पढेर सरांशी फोनवर अनेकदा बोलणे होत असे. त्यांच्याशी बोलत असताना बुरसे सरांचा उल्लेख वारंवार होऊ लागला. समाजासाठी झटणारा एक शिक्षक... शिक्षणाच्या मर्यादेपलीकडे जाऊन जे जीवन जगतो, त्याच्या ठशांचे संदर्भ कानावर पडू लागले. शेवटी ठरवलं – “हा अनुभव प्रत्यक्ष घ्यायचाच.”
खास बुरसे सरांशी भेटायला म्हणून मी पढेर सरांना सांगून पुण्यात गेलो. रविवार असल्याने शाळा बंद होती. सरांची शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच राहण्याची व्यवस्था केलेली होती. तिथेच घरी त्यांच्याशी पहिली भेट झाली आणि क्षणभर वाटलं, जणू मी एखाद्या नदीच्या उगमावर पोहोचलोय. त्यांचं बोलणं मृदू, पण आशयाने ठासून भरलेलं; डोळ्यांत झळकणारी जाणीव, की आपण समाजात काहीतरी बदल घडवतोय आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नी, सौ. सुनिता बुरसे मॅडम, ज्यांचा निखळ संयमी स्वभाव, गोडवा आणि सहकार्य मला स्तब्ध करून गेले.
बुरसे सर हे एक विद्यापीठ आहेत, जे शाळेच्या भिंतीत मर्यादित नाही. त्यांचे कार्य आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र राज्यच्या माध्यमातून बघायला मिळालं, तिथेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक बाजू उलगडली. एकदा सर आमच्या शाळेत आले, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला. त्यांना जेवायला घरी बोलावलं. तेव्हा जाणवलं, समाजकार्य म्हणजे भाषण नव्हे, ती एक जीवनपद्धती आहे. त्यांच्या प्रत्येक वाक्यात एक हळवी जाणीव होती, की आपल्या समाजात अनेक गोष्टी अपूर्ण आहेत आणि त्यातील शक्य त्या बाबी पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे.
माझ्या आयुष्यात असा एक वळणबिंदू आला, जेव्हा मी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. बुरसे सरांनी खूप समजावलं, आपले अनुभव सांगितले. पण माझं मन फक्त एकाच दिशेने धावत होतं – सामाजिक संशोधन, लेखन आणि स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक राहणं. मी सरांचं म्हणणं ऐकलं नाही, पण त्यांनी जो आत्मीयतेचा हात त्या वेळी माझ्या पाठीवर ठेवला, तो आजही प्रेरणेसारखा सोबत आहे.
सरांनी अनेकांच्या आयुष्याला आकार दिला आहे. केवळ शिक्षक म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून. त्यांनी अनेकांची घरं उभी केली, अनेकांच्या संसाराला हातभार लावला. आदिवासी मुलांच्या भवितव्यासाठी लढा दिला आणि हे सर्व करत असताना, त्यांच्या पत्नी, सुनिता बुरसे मॅडम ह्या प्रत्येक पावलावर त्यांच्या सोबत उभ्या राहिल्या. गावाकडच्या बहिणीचं घर उभं करताना मॅडम ज्या प्रेमाने सहभागी झाल्या, ते पाहून मला त्या दोघांतील कौटुंबिक एकोपा पवित्र वाटला. आजच्या आधुनिक आणि भांडवलशाही युगात असे कौटुंबिक स्वास्थ्य फार दुर्मिळ झाले आहे.
सरांचं घर माझ्यासाठी आणि माझ्या मुला–मुलीसाठी एक हक्काचं आजोळ आहे. स्पंदन आणि ईरा यांच्याशी त्यांचं नातं केवळ आपुलकीचं नाही, तर एका आदर्श शिक्षकाचं आपल्या विद्यार्थ्यांशी असणारं नातं आहे. त्यांच्या घरात गेल्यावर वाटतं – इथं सगळं खरं आहे, निखळ आहे, पवित्र आहे...अगदी निसर्गासारखं.
एक प्रसंग मनात ठसा उमटवून गेलाय...आभाच्या क्लाऊड किचनच्या उद्घाटनाला मी अचानक गेलो. निमंत्रण नव्हतं, तरी गेलो. तिथे सरांचा मित्रपरिवार, ओळखीच्या मंडळींनी ज्या आपुलकीने माझ्याशी संवाद साधला, ते पाहून मन भरून आलं. आभाने सहज म्हटलं, “अरे, यांना कोण नाही ओळखत? आपल्या घरात एक दिवस असा जात नाही, कि त्या दिवशी यांचे नाव घेतले जात नाही.” त्या एका वाक्याने माझ्या अस्तित्वाला एक नवी ओळख दिली.
बुरसे सरांनी दिलेली ‘पेशवे’ आणि ‘डार्विन’ ही पुस्तके मला नव्याने बदलायला भाग पाडून गेली. त्या पुस्तकांतील शब्दांमध्ये फक्त माहिती नव्हती, तर विचारांचं आव्हान होतं. त्यांनी उद्देशपूर्वक ती मला दिली याची जाणीव व्हायला मला वेळ लागला नाही आणि त्या उद्देशाला मी लेखनात उतरवलं. सरांचा शब्द होता, “तू लिही. मी आहे. प्रकाशनाचं आपण बघू.” हा विश्वास माझ्या लेखणीला दिशा देणारा ठरला.
आज जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा वाटतं – बुरसे सर हे केवळ एक शिक्षक, मुख्याध्यापक नाहीत, ते एक शिल्पकार आहेत. त्यांनी शाळा घडवल्या, समाज घडवला आणि माणसं घडवली. त्यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे संयम, संवेदना, शिस्त आणि आपुलकी यांचा संगम आहे. त्यांच्या बोलण्यात ना दिखावा आहे, ना गर्व; आहे तो फक्त सच्चेपणा आणि जिव्हाळा. समाजसेवेचा झरा असाच वाहत रहावा, हीच सरांसाठी शुभेच्छा. त्यांच्या कार्याचा प्रकाश अनेक पिढ्यांना असाच प्रकाश देत राहो. त्यांच्या आयुष्याचं हे नितळ, निर्मळ दर्शन मला लाभलं, ही माझ्या जीवनातील एक अनमोल भेट आहे आणि निसर्गाने मला हि अशी माणसं माझ्या जीवनात दिली याचा मला पुरेपूर अभिमान आहे. मी माझ्या जीवनात काही कमवू शकलो नाही...ना घर...ना बँक बॅलन्स...पण माणिक मोत्यांपेक्षा अधिक मौल्यवान असणारी सुनिता बुरसे मॅडम व एकनाथ बुरसे सरांसारखी माणसं मार्गदर्शक म्हणून लाभली यातच जीवनाचे चीज झाल्यासारखे आहे.
- राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment