'धांगड की धनगर :- शोध वास्तवाचा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न....




'धांगड की धनगर :- शोध वास्तवाचा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न....








निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, निगडी येथे आदिवासींच्या न्यायालयीन लढाईचे व आरक्षणविषयक तरतुदींचे विश्लेषण करणारे पुस्तक धांगड की धनगर: शोध वास्तवाचा हे पुस्तक राजू ठोकळ यांच्या संशोधनातून साकारले आहे. या कार्यक्रमासाठी आमदार डॉ. किरण लहामटे, ॲड. डॉ. उदय वारुंजीकर, ॲड. नितीन गांगल,ॲड. सिद्धेश बिरादार, जयेंद्र दुबळा, मधुसूदन मोहिते, डॉ.संतोष सुपे, डॉ.संजय दाभाडे, वसंत पिचड, शास्त्रज्ञ डॉ. रामदास डामसे, डॉ. नितीन बस्ते, सतीश लेंभे, सुनिता बुरसे, शास्त्रज्ञ राहुल भांगरे, साहित्यिक कृष्णा भवारी, वसंत पिचड, मुरलीधर बांडे, भरत मेंगाळ, मेजर बांगर, डॉ.अशोक धिंदळे, प्रविण पारधी, दत्तू भवारी, पंकज ठाकरे, चेतन खंबाईत, आकाश शेळके, माजी नगरसेविका उषाताई मुंढे व आशाताई सुपे आणि आदिवासी समाजातील इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ बुरसे यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी क्रांतिकारक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात आदिवासींची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडणाऱ्या वकिल, सामाजिक संघटना व सामाजिक प्रतिनिधी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. 






कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून डॉ. संतोष सुपे यांनी धनगर व आदिवासी यांच्या आरक्षणविषयक लढ्यामध्ये आदिवासी समाजाची बाजू मांडताना विविध कागदपत्रे, संदर्भग्रंथ, शासकीय अहवाल यांची मदत होती आणि ती मदत समाजातील विविध संशोधक मित्रांनी वेळीच पूर्ण करू शकल्याने आदिवासींच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयात निकाल लागला. या अनुषंगाने संविधानिक मांडणी करणारे पुस्तक येणे आवश्यक होते आणि तो प्रयत्न 'धांगड की धनगर: शोध वास्तवाचा' या पुस्तकाच्या अनुषंगाने करण्यात आलेला आहे.







पुस्तकाचे लेखक राजू ठोकळ यांनी पुस्तक लेखन करण्यामागील आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की हे पुस्तक मी कोणाच्या विरोधात केलेले नसून आदिवासींची संविधानिक बाजू अधिक बळकट करण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. धांगड की धनगर हा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय व न्यायालयीन पटलावर असणारा वाद दोन्ही समाजाचे नुकसान करत असून यातून जातीय संघर्ष उभा राहिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मूळ मुद्दे, प्रश्न दुर्लक्षित होत असल्याने हे पुस्तक लिहून समाजाला दिशा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मत मांडले.






धनगर आरक्षण प्रकरणी आदिवासींची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. डॉ. उदय वारुंजीकर यांनी आपल्या मनोगतातून पुस्तकाचे महत्त्व एक संदर्भग्रंथ म्हणून असेल व याचा फायदा फक्त आदिवासी समाजाला नाही, तर न्यायाची संविधानिक लढाई लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला होईल असा आशावाद व्यक्त केला. पुस्तकात धनगर व आदिवासी या जाती जमातींच्या अनुषंगाने करण्यात आलेली मांडणी ही आरक्षण चळवळीत काम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असून यामुळे आदिवासींच्या यापुढील काळातील न्यायालयीन व सामाजिक लढाईला बळ मिळणार आहे असेही त्यांनी मनोगतातून व्यक्त केले.





ॲड.नितीन गांगल हे देखील मुंबई उच्च न्यायालयात आदिवासींच्या बाजूने विविध केसेसमध्ये लढत असतात. त्यांनी देखील चिकित्सक मांडणी करणाऱ्या व जातीपातीच्या बंधनात न अडकता संविधानिक मांडणी करणा-या साहित्याची गरज आज समाजात आहे. त्यादृष्टीने आदिवासी समाजातील लेखकांनी पुढाकार घेऊन लेखन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

अकोले विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांनी 'धांगड की धनगर: शोध वास्तवाचा' या पुस्तकाच्या माध्यमातून आदिवासींच्या संविधानिक आरक्षणाची चौकट अधिक बळकट करण्याचे काम केले असल्याचे मत मांडले. यामुळे प्रशासन व राजकीय पातळीवर जनतेचे प्रतिनिधी म्हणून आदिवासींची बाजू मांडण्याचा कामात सक्षम आधार प्राप्त झाला असल्याचे समाधान व्यक्त केले. 

पालघर जिल्हा परिषदेचे मा. जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीत लेखक राजू ठोकळ यांची भूमिका किती महत्त्वाची आहे याबाबत विवेचन करून साहित्य निर्मिती ही काळाची गरज असल्याचे मत मांडले. 

धनगर व आदिवासी आरक्षण हा वाद अतिशय संवेदनशील असल्याने यावर कोणताही अभिनिवेश मनात न ठेवता लेखन करणे फार अवघड काम होते, परंतु लेखकाने आपल्या संशोधकवृत्तीला न्याय देत अतिशय चांगली मांडणी या पुस्तकात केलेली आहे असे चिकित्सक मत डॉ. संजय दाभाडे यांनी मांडले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून एकनाथ बुरसे यांनी साहित्यिकांच्या पाठीशी समाज उभा राहिला तर समाजाला बळ व दिशा देणारे साहित्य निर्माण करण्याचे काम आपले लेखक नक्की करतील असे मत मांडले. या पुस्तकाच्या माध्यमातून आदिवासींमध्ये नव्या ताकदीचे लेखक उदयास येत असल्याचे समाधान देखील व्यक्त केले. तसेच लेखकाने पुस्तकात मांडलेले विचार समाजात पोहचविण्याचे काम उपस्थित संघटना प्रतिनिधी व समाज बांधव यांचे आहे, तरच साहित्य लेखनाचा उद्देश सफल होईल असे मत मांडले. 

या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास आदिवासी समाजातील अनेक अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, साहित्यिक व समाज बांधव बाहेर धो धो पाऊस पडत असताना उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रम उत्तम झाल्याने व आदिवासी समाजातून वैचारिक व संविधानिक मांडणी करणारे पुस्तकं लिहिली जात आहेत याबाबत समाधान व्यक्त केले. अनेकांनी पुण्यात असा पुस्तक प्रकाशन सोहळा अनेक वर्षांतून अनुभवला असल्याने एक वेगळेच समाधान व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा लेंभे यांनी केले तर आभार हरिभाऊ साबळे सर यांनी मांडले.




मा श्री. आचार्य देवव्रत साहेब, राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांना  'धांगड कि धनगर : शोध वास्तवाचा' हे पुस्तक दिनांक २७/१०/२५ रोजी भेट म्हणून देण्यात आले.



0 comments :

 


आदिवासी विचार

आदिवासी विचार म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनमूल्ये, संस्कृती, परंपरा, आणि जगण्याच्या पद्धती यांचा अभ्यास व त्यांचे महत्त्व. आदिवासी समाज हा निसर्गाशी अत्यंत जवळचा असल्यामुळे त्यांच्या विचारसरणीत निसर्गसंवर्धन, सहजीवन, सामूहिकता आणि श्रमाला महत्त्व असते. आदिवासी विचार हे केवळ जीवनशैलीचे प्रतिबिंब नसून, समग्र मानवतेला शाश्वत जीवनाची शिकवण देतात.

Trending Posts








Followers

Total Pageviews

Contact Form

Name

Email *

Message *

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा





Book Publication

LOGO

LOGO

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9595959357 .

© Aboriginal Publication. You are not allowed to publish the content from this blog without permission.

Aboriginal Publication is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find information about book publication.