इतिहास संशोधनात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ.विलास गवारी सर यांना गडकिल्ले सेवा संस्था महाराष्ट्र राज्य व भटकंती कट्टा यांच्याकडून 'क्रांतीपाईक प्रमोद मांडे पुरस्कार' आज प्रदान करण्यात आला. प्रमोद मांडे सरांचे लेखन व व्याख्याने ऐकत बरंच काही आम्ही शिकलो आणि त्या नावाने आपल्या मित्राला पुरस्कार मिळणे ही बाबच माझ्यासारख्याला दहा हत्तीचे बळ देऊन जाणारी आहे.
गेल्या दोन अडीच वर्षांपूर्वी सरांचे 'वासाहतिक महाराष्ट्रातील आदिवासींचे उठाव' हे पुस्तक वाचण्यात आले आणि त्यातून सह्याद्रीच्या राखणदारांचा मौलिक इतिहास उजेडात आला. या इतिहासाने आम्हाला एक प्रेरणा दिली आणि सामाजिक पातळीवर काम करताना भूगोल आणि इतिहास किती महत्त्वाचा आहे याची नव्याने मांडणी करण्याची दृष्टी दिली.
आदिवासी संस्कृती, इतिहास आणि भूगोल या आपल्या समाजाच्या मूळ जडणघडणीतील अनिवार्य घटक आहेत.
भारतीय सभ्यतेचा पाया घडवताना या संस्कृतींनी माती, निसर्ग आणि मानव यांच्या नात्याला एक वेगळा अर्थ दिला. परंतु, दुर्दैवाने या विषयांवर अपेक्षित असे संशोधन झालेले नाही. इतिहासाच्या पुस्तकांत या संस्कृतींचा उल्लेख फक्त तळटिपांमध्ये सीमित झाला आहे. लेखणीचा आधार तर अजूनही अपुरा आहे आणि हीच रिकामी जागा सरांनी आपल्या प्रगल्भ अभ्यासाने, संवेदनशीलदृष्टीने आणि तळमळीच्या लेखणीने भरून काढली आहे. त्यांनी आदिवासींच्या जीवनपद्धतीचा, त्यांच्या संघर्षांचा आणि सांस्कृतिक वैभवाचा एक साक्षेपी दस्तऐवज उभा केला आहे.
इतिहासतज्ञ Arnold Toynbee म्हणतात, “Civilizations die from suicide, not by murder.” म्हणजेच संस्कृती बाह्य शत्रूंनी नाही तर आपल्या विस्मृतीने नष्ट होतात.
सरांनी या विस्मृतीविरुद्धची लढाई लेखणीच्या माध्यमातून लढली आहे. त्यांचे कार्य म्हणजे आदिवासी इतिहासाचे पुनरुज्जीवन आणि सांस्कृतिक पुनर्भिमानाची चळवळ आहे.
ही लेखणी म्हणजे इतिहासाला नवा श्वास देणारी ज्योत आहे. ती ज्योत सतत प्रज्वलित राहो, हीच शुभेच्छा. सरांच्या संशोधन कार्याला या पुरस्काराने अधिक गती मिळेल यात शंका नाही.
सर आपले अभिनंदन व पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा..!
0 comments :
Post a Comment