About Me

 





सह्याद्री पर्वतरांगांतील एक समाजशील शिक्षक


            अकोले तालुक्यातील केळी रुम्हणवाडी येथे दि.१९ जून १९८३ रोजी जन्म झालेल्या व सध्या श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई संचलित शाळेत कार्यरत असणारे माध्यमिक शिक्षक राजू ठोकळ यांना सामाजिक व शैक्षणिक कार्यातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा हा संक्षिप्त आढावा....


            राजू ठोकळ यांचा जन्म एका शेतकरी आदिवासी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण व पूर्ण शिक्षण हे इंदिरा आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या झोपडीत राहूनच झाले. घरात लाईट नसल्याने दिवा पेटवून अभ्यास केला. परीक्षेच्या कालावधीत अधिकचा अभ्यास करण्यासाठी गावातील मित्रांकडे मुक्कामी जाऊन अभ्यास करत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. जि.प. प्राथमिक शाळेत प्राथमिक व शासकीय आश्रमशाळेत माध्यमिक शिक्षण गावातच पूर्ण केले. इयत्ता दहावीला चांगले गुण मिळाल्याने  विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला. त्यावेळी विज्ञान शाखेचे शिक्षण हे  गावापासून दूर फक्त तालुक्यालाच उपलब्ध असल्याने त्याला अधिक खर्च येणार म्हणून वडिलांनी प्रवेशासाठी लागणारे पैसे जमवण्यासाठी घरातील भात विकले. परंतु त्यातून जेमेतेम पैसे जमा झाल्याने आपण विज्ञान शाखेची फी भरू शकणार नाही याची कल्पना दिली. हताश होऊन शेवटी समशेरपूर येथील विद्यालयात इयत्ता अकरावी कला शाखेत प्रवेश घेतला. पुढे पदवीचे शिक्षण अगस्ती कला, वाणिज्य व  विज्ञान महाविद्यालय, अकोले येथे तर पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातील इंग्रजी विभागातून चांगल्या गुणांनी पूर्ण केले. पुणे शहरात शिक्षण घ्यायचे असेल, तर त्यासाठी अधिक खर्च येणार होता. याची जाणीव ठेऊन ‘कमवा व शिका’ योजनेच्या मदतीने आर्थिक मदत उभी करण्याचे काम केले. पुणे विद्यापीठातील गुणवत्तेच्या जोरावर खरं तर विविध स्पर्धा परीक्षेच्या संधी होत्या. तशी तयारी देखील सुरु केलेली होती. दरम्यानच्या काळात नव्यानेच लग्न झालेल्या लहान बहिणीचा नवरा लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर रस्ते अपघातात मृत्यू पावला आणि याचा प्रचंड मोठा आघात कुटुंबावर झाला.  त्यानंतर थोड्याच दिवसात गावी वडिलांना बैलाने मारल्याने त्यांना वर्षभर अंथरुणाला खिळून बसावे लागले व त्यामुळे कुटुंबाची आर्थिक अडचण तर झालीच परंतु शेतीची कामे देखील वेळेत होऊ न शकल्याने कौटुंबिक परिस्थिती बिकट झाली. यामुळे नोकरी करण्यासाठी बी.एड. करायचे की नेट-सेट करायचे हा प्रश्न मनात डोकावला होता. घरच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता बी.एड.साठी पुणे येथील टिळक शिक्षण महाविद्यालयात प्रवेश घेतला व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन लगेच श्री गाडगे महाराज मिशनच्या शाळेत नोकरीसाठी रुजू झाले.


           कर्मयोगी संतश्रेष्ठ गाडगे महाराज यांच्या विचारांनी कार्यरत असणाऱ्या संस्थेत नोकरी लागल्याने गाडगे बाबांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा प्रभाव पडायला वेळ लागला नाही. त्यातूनच चार भिंतींच्या आत चालणा-या अध्यापनाच्या कार्यात अडकून न पडता विविध सामाजिक कार्यात सहभाग घ्यायला सुरुवात केली. सामाजिक काम करत असताना आपल्या दैनंदिन अध्यापनात विविध उपक्रम देखील राबविण्याचे काम केले. व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, तज्ञांची व्याख्याने, समुपदेशन, फिल्म डे, जंगल वाचन, हस्तलिखित, वन भोजन, शैक्षणिक सहल, क्रीडा स्पर्धा, वकृत्त्व स्पर्धा, भाषाविषयक खेळ इत्यादी उपक्रमांचा यशस्वी वापर करून शाळेचा इंग्रजी विषयाचा आलेख नेहमी उंचावण्याचे काम केले. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या कल्पकतेचा वापर करून विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य देखील तयार केलेले आहे. इंग्रजी विषयाच्या उत्कृष्ट निकालाबाबत अनेकदा मुख्याध्यापक संघ पुणे जिल्हा यांच्याकडून सन्मानित करण्यात आलेले आहे. विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने शाळेला यथोचित मदत मिळविण्यासाठी सतत प्रयत्न केले जातात. झोपडीत बालपण गेल्याने झोपडपट्टी असो वा डोंगरदऱ्यातील मुलं, माणसं यांचा विशेष कळवळा कार्यातून दिसून येतो. आपल्या विचारांपासून तसूभरही फारकत घेत नसल्याने अनेकदा विविध पातळीवर संघर्ष पाहायला मिळतो. यामुळे अनेकदा अनेक माणसं दुरावली पण जातात. परंतु याचे सोयर सुतक कधी यांनी पाळले नाही. कारण ज्यांना विचार आणि तत्त्व समजत नाही, त्यांच्याशी सलगी असलीच पाहिजे असा काही नियम नाही असे ते मानतात.


            शैक्षणिक कार्याबरोबरच आदिवासी संस्कृती, परंपरा, जीवनशैली, आरोग्य, कुपोषण, इतिहास, शिक्षण, बेरोजगारी, अत्याचार  इत्यादी विषयांवर सातत्याने लिखाण केलेले आहे. आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे म्हणून विविध मेळाव्यांचे आयोजन भीमाशंकर, आंबेगाव, जुन्नर, अकोले, इगतपुरी, डहाणू, जव्हार इत्यादी भागात करण्यात पुढाकार घेतलेला आहे. आदिवासी बोली भाषेत पुस्तकांची निर्मिती व्हावी यासाठी आदिवासी बोलीभाषा साहित्य प्रमाणीकरण समिती, विद्या परिषद, पुणे यांच्याकडेही अनेकदा सादरीकरणे केले. तसेच सुधारित आश्रमशाळा संहिता निर्माण करत असताना झालेल्या सर्वेक्षणाच्या कार्यात सहभाग घेतला होता. नुकताच मुलुंडजवळील नाहूर येथे महानायक राघोजी भांगरे यांच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. त्यावरील ऐतिहासिक मजकूर लिहिण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. भलर या आदिवासी त्रैमासिकाचे काही दिवस संपादक म्हणून काम पाहिलेले असून विविध पुस्तकांच्या मुखपृष्ठ निर्मितीत योगदान दिलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या कथा विविध भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या असून त्यावर काही विद्यार्थी संशोधन करण्याचे काम देखील करत आहेत. प्रतिलिपी या ऑनलाईन माध्यमात लिहिलेल्या कथा लाखो वाचकांनी वाचलेल्या आहेत. तसेच त्यांचे ब्लॉग्स, व्हिडीओ हे देखील जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. गडकिल्ले भटकंती, दुर्ग संवर्धन, वाईल्डलाईफ फोटोग्राफी, आदिवासी व ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकणारी फोटोग्राफी असेही छंद त्यांनी जोपासलेले आहेत.  आदिवासी साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात सातत्याने प्रयत्नशील असल्याने त्यांनी स्वतःची प्रकाशन संस्था देखील स्थापन केलेली असून त्याच्या माध्यमातून दर्जेदार व आदिवासी समाजाला दिशा देणारे साहित्य प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस आहे. निर्व्यसनीपणा व स्पष्टवक्तेपणा या अंगभूत गुणांमुळे सामाजिक कार्यात गती मिळाली. आपल्या कार्यात प्रामाणिकपणा असेल तर मदतीस हजारो हात पुढे येतात हेच त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.


        राजू ठोकळ यांचे 'धांगड की धनगर: शोध वास्तव्याचा' हे संशोधनात्मक पुस्तक व 'पहाडी फुलोरा' हा कविता संग्रह प्रकाशित झालेला असून 'गाडगेबाबांचे पत्रलेखन: समजपरिवर्तनाचे तत्त्वज्ञान' हे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. तसेच 'अरण्य रुदन' (कविता संग्रह), 'रानफुलं' (कथासंग्रह), 'माती, बीज आणि ममता' (व्यक्तीचित्रण) व 'कोळी महादेव : अभिलेख, पुरावे आणि वास्तव' याचे लिखाणाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. 


        विविध संस्था, संघटना, चळवळी यांच्या सोबत काम करत आपली वाटचाल सुरु असलेले हे व्यक्तिमत्त्व खरं तर स्टेजवर जायला नाही, तर स्टेज दुसऱ्यांसाठी निर्माण करत आले आहे. आदिवासी साहित्य निर्मितीसाठी नव्याने साहित्यिकांची वाढ व्हावी म्हणून प्रयत्नशील असलेल्या या ध्येयवेड्या शिक्षकास पुढील कार्यासाठी शुभेच्छा....!


- बाबूभाई रोंगटे, प्रसिद्ध आदिवासी ग्राफिक्स डिझाईनर 


           


0 comments :

 

Coming Soon

Coming Soon

Coming Soon

Coming Soon

आदिवासी विचार

आदिवासी विचार म्हणजे आदिवासी समाजाच्या जीवनमूल्ये, संस्कृती, परंपरा, आणि जगण्याच्या पद्धती यांचा अभ्यास व त्यांचे महत्त्व. आदिवासी समाज हा निसर्गाशी अत्यंत जवळचा असल्यामुळे त्यांच्या विचारसरणीत निसर्गसंवर्धन, सहजीवन, सामूहिकता आणि श्रमाला महत्त्व असते. आदिवासी विचार हे केवळ जीवनशैलीचे प्रतिबिंब नसून, समग्र मानवतेला शाश्वत जीवनाची शिकवण देतात.

Trending Posts




माती, बीज आणि ममता

माती, बीज आणि ममता




Followers

Total Pageviews

Contact Form

Name

Email *

Message *

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा

वाघाशी लढणारा आदिवासी बांधव व त्याची आठवण जपणारी ही स्मृतीशिळा





Book Publication

LOGO

LOGO

About Me

My photo
Pune, Maharashtra, India
I am a freelance writer and love to write basically about Tribal Culture and Tribal History. Even I also like to write about thoughts of Gadge Maharaj. Trekking is my hobby and photography is one of the part of it. Social awareness is a necessity in todays era, so love to talk to the tribal people. Shivaji Maharaj, Birsa Munda, Tantya Mama Bhil, Raghoji Bhangare etc. are my inspirations and Abdul Kalam is my ideal person. I have many friends and everybody is eager to work for our society.

You are most welcome on this page.

Notice

If you have anything to share, share it on our What's app No. 9595959357 .

© Aboriginal Publication. You are not allowed to publish the content from this blog without permission.

Aboriginal Publication is a blog which tells you information about Tribal Culture, history and many more. You can also find information about book publication.