‘संस्कृती’ हा शब्द अनेकदा इतका व्यापक आणि गोंडसपणे वापरला जातो की त्यामागील वास्तव अस्पष्ट होते. ते वास्तव जो पर्यंत उघडपणे आपण समजून घेत नाही, तो पर्यंत आपण अंधभक्त म्हणून काम करत राहतो आणि असे काम कधीही धोकादायक असते.
आदिवासी संस्कृती म्हणजे केवळ पारंपरिक पोशाख, नृत्य, गाणी नव्हे, तर ती आहे जगण्याची विशिष्ट पद्धत, निसर्गाशी असलेले संबंध, मूल्यव्यवस्था, समतावादी जीवनशैली आणि आत्मनिर्भरता.
जेव्हा आदिवासी संस्कृतीचा प्रचार होतो, तेव्हा विचारवंताने मनाशी विचार केला पाहिजे की, प्रचारकाला आदिवासी संस्कृतीच्या कोणत्या अंगाबद्दल बोलायचे आहे? कोणत्या उद्देशाने प्रचार चालतो आहे? हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत.
अनेकदा राजकीय ताकद वाढविण्यासाठी, निधी उकळण्यासाठी किंवा ‘लोकप्रियता’ मिळवण्यासाठी, आदिवासी संस्कृतीचा वापर ‘ब्रँड’ म्हणून केला जातो.
येथे ‘संस्कृती’ ही खरी आदिवासी जीवनपद्धती नव्हे, तर तिचं एक काल्पनिक, वापरण्यायोग्य रूप बनतं.
बदलणारी संस्कृती हीच खरी संस्कृती हा निसर्ग नियम आपण समजून घेतला पाहिजे. एक मोठा गैरसमज असा की, जुनी गोष्ट म्हणजे ती शाश्वत आणि पवित्र असते, किंवा ती बदलली तर तिचं मोल संपतं. पण वस्तुस्थिती अशी आहे की आदिवासी संस्कृती ही स्थितिकालात व गरजेनुसार बदलणारी आहे.
आदिवासी माणसाने शेती केली, शिकार सोडली, मोबाइल घेतले, डिजिटल जग स्वीकारलं – हे सर्व केलं म्हणजे संस्कृतीचा अंत नाही. उलट, हीच तर तिची लवचिकता आहे, जे तिचं ‘आदिवासीयत्व’ अधिक समृद्ध करतं.
आज आदिवासी संस्कृती संवर्धनाच्या नावाखाली आदिवासी संस्कृतीचा राजकीय वापर होत आहे, म्हणून सावधगिरीची गरज आहे. जेव्हा राजकीय हेतूसाठी आदिवासी संस्कृतीचा प्रचार होतो, तेव्हा ती प्रतिनिधित्वाऐवजी उपकरण बनते.
विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी आणि आदिवासींनी स्वतः या प्रचाराचा हेतू, व्याप्ती आणि प्रभाव याचा सूक्ष्मपणे विचार करायला हवा.
आदिवासी संस्कृती ही एक स्थिर, बंद वस्तू नाही; ती सजीव, परिवर्तनशील आणि गरजेनुसार आकार घेणारी आहे. तिचा प्रचार करताना केवळ ‘परंपरा’ नव्हे तर तिचा आजचा संदर्भ, भविष्यातील दिशा आणि तिला संपूर्णतेने समजण्याची गरज लक्षात घेतली पाहिजे.
‘संस्कृती’ हा शब्द जर केवळ आकर्षक मुखवटा ठरला आणि त्याआडून सत्ता, निधी किंवा लोकप्रियता मिळविण्याचा उद्देश असेल – तर ती आदिवासींची नाही, ती प्रस्थापितांची गरज असते.
प्रस्थापितांच्या गरजेसाठी आपण आपला अमूल्य वेळ आणि घामाचा पैसा व्यर्थ घातला अशी पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये असे वाटत असेल तर आपण चिकित्सक बनले पाहिजे.
- राजू ठोकळ
0 comments :
Post a Comment