कुठल्या योजनेचा कागद फिरत होता
जेव्हा माझं लेकरू कुपोषणानं कोसळलं?
डोंगराच्या पायथ्याशी
मातीतून वाफेवर वाढणारं पिठाचं भूत
आमचं नशीब ओरबाडत होतं
आणि वर सत्ता म्हणत होती
"प्रगती झाली आहे!"
मी काळाच्या
फाटलेल्या चड्डीला ठिगळ लावतोय,
पण सरकार व्हिजन मांडू पाहतंय,
शेअर बाजारात सेन्सेक्स चढतोय
पण योजनांच्या शेवटच्या पानावर
मात्र माझं अस्तित्वही नसतं!
हे शिक्षण?
ते फक्त शहरात
हाजरी लावणारं शहाणपण!
इथे जंगलात,
पाटीवरच्या पहिल्या ओळीमध्ये
आदिवासी असं लिहून
शिक्षकांची अनुपस्थिती सुरु होते!
एक बोगस बनतो अधिकारी
माझ्या रक्तसंबंधाचा खोटा दाखला देऊन
तसाच धनगर होतो डोईजड
आपली राजकीय ताकद वापरून
ज्याच्या गावात कधी आदिवासीपण नव्हतं
तो पेसाच्या नियोजनात सभापती होतो
मी ओरडतो -
"मी मूळ आहे"
तेव्हा ते 'पुराव्याची' मागणी करतात
आणि ज्या झाडाखाली माझी आई बाळंत झाली,
ते झाड आता प्रकल्पाच्या कुंपणात आहे!
सरकारी निधीचं काय?
कधी डोंगर चढून पोहचतंच नाही
कधी परस्पर वळवली जाते
कधी 'संस्था' खातात,
कधी मंत्री खातात
पण आम्ही?
आम्ही जर्मलच्या टोपातलं पाणी मोजतोय,
की पुरेल का उद्यापर्यंत?
हा देश मला बांधव म्हणतो प्रतिज्ञेत,
पण माझ्या नावावरच्या
जमातीचा 'क्लोन' तयार करून
आरक्षणाचं झाड
माझ्याच बगलेतून दुसऱ्याला देतो!
हा देश माझा असू नये
इतकं मी जगलो आहे,
अन् जरी सांगितलं,
"तू नागरिक आहेस,"
तरी शाळेच्या रांगेत
माझ्या पोराला विचारलं जातं
"तुझं कुळ काय रे?"
माझं कुळ
झाडावर बसलेल्या काळया कावळ्यासारखं आहे
त्याला कोणतंही शासन ओळखत नाही,
पण त्याचं शंखासारखं काळं डोकं तुझ्या फसव्या
स्वातंत्र्याच्या झेंड्यापेक्षा खरं वाटतं!
आता मला ना कविता लिहायच्या आहेत
ना घोषणा द्यायच्या आहेत
मला फक्त माझ्या जमिनीच्या आत सांडलेलं
माझं स्वतःचं अस्तित्व परत मिळवायचं आहे
- राजू ठोकळ

1 comments :
आदिवासी दिनाचे औचित्य साधत अत्यंत मार्मिक भावना मांडल्या आहेत...
Post a Comment